मुंबई : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप शनिवारी दुपारपर्यंत जाहीर झालं नाही, तर समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार, असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच समाजवादी पक्षाला 5 जागा मिळाव्यात, अशी विनंतीही त्यांनी केलीय.
25 जागांवर स्वबळावर उमेदवार : समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस देखील इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. "शनिवारी दुपारपर्यंत समाजवादी पक्षाच्या जागांबद्दलचा अंतिम निर्णय झाला नाही, तर समाजवादी पक्ष राज्यात 25 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करेल," असा इशारा अबू आझमी यांनी दिलाय. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत समाजवादी पक्षाला सहभागी करून घेण्यात आलं नसल्यानं आझमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण आज समाजवादी पक्षाच्या जागांबद्दलचा स्पष्ट निर्णय घेण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आझमी यांनी दिली. आपल्याला आज देखील पवारांकडून बोलावणं आलं नव्हतं, मात्र आपण स्वतः पवारांकडे चर्चा करायला आलो असल्याची माहिती त्यांनी दिली.
4 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार जाहीर : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यापूर्वीच राज्यात 4 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. समाजवादी पक्षाचे विधानसभेत सध्या शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून अबू आझमी व भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख हे दोन आमदार आहेत. या 2 जागा व भिवंडी पश्चिममधून रियाज आझमी व मालेगांवमधून शाने हिंद या चार उमेदवारांची घोषणा पक्षानं केलीय. पाच दिवसांपूर्वी अबू आझमी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पवारांना समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या मतदारसंघाबाबत व तेथील परिस्थितीबाबत माहिती दिली होती. अखिलेश यादव यांनी स्वत: या मतदारसंघाची व उमेदवारांची चर्चा करुन निर्णय घेतल्याची माहिती आझमी यांनी दिली.
हेही वाचा