मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आता शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महामुंबई आणि कोकण परिसरातील विधानसभेच्या 75 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यापैकी अनेक जागांवर थेट दोन्ही शिवसेनेत तर काही जागांवर ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना सोबत मनसेची लढत होत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेत या 75 जागांचं फार महत्व असल्यानं या जागांवर सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
दोन्ही शिवसेनेसाठी अटीतटीचा मुकाबला : महामुंबई आणि कोकण परिसरातील एकूण 75 जागांपैकी जवळपास 45 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीचा एकंदरीत या पट्ट्यातील परफॉर्मन्स हा पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भरवशावर आहे. परंतु जागा वाटपात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी हट्टापायी जागा वाढवून घेतल्या. त्या जागांवर जर पराभव झाला, तर याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 23 विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढत आहे. तर काँग्रेस 11, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढत आहे. त्याचप्रमाणे महायुतीकडून भाजपानं 18, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 अशा 36 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मनसे व महायुतीत वाद निर्माण झाल्यानं शिवडी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही आहे. या मतदारसंघात भाजपानं मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दोन सेना, मनसे अशा तिरंगी लढती : मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा सामना शिवसेनेचे मिलिंद देवरा यांच्या विरोधात होत असून मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आल्यानं येथं तिरंगी सामना होणार आहे. त्याचप्रमाणे माहीम मतदारसंघातही शिवसेनेकडून सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली असून येथंही तिरंगी लढत आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेकडून विद्यमान आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुभाष भोईर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं येथंही तिरंगी लढत होणार आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना (उबाठा) पक्षातील महत्त्वाच्या लढती
- जोगेश्वरी पूर्व - शिवसेना, मनीषा वायकर विरुद्ध शिवसेना (उबाठा), अनंत (बाळा) नर
- कुर्ला - शिवसेना, मंगेश कुडाळकर विरुद्ध शिवसेना (उबाठा), प्रवीणा मोरजकर
- भांडुप पश्चिम - शिवसेना, (अशोक पाटील) विरुद्ध शिवसेना (उबाठा), रमेश कोरगांवकर
- भायखळा - शिवसेना, यामिनी जाधव विरुद्ध शिवसेना (उबाठा), मनोज जामसुतकर
- सावंतवाडी - शिवसेना, दीपक केसरकर विरुद्ध शिवसेना (उबाठा), राजन तेली
- रत्नागिरी - शिवसेना, उदय सामंत विरुद्ध शिवसेना (उबाठा), बाळ माने
- राजापूर - शिवसेना, किरण सामंत विरुद्ध शिवसेना (उबाठा), राजन साळवी
- कुडाळ - शिवसेना, नितेश राणे विरुद्ध शिवसेना (उबाठा), वैभव नाईक
हेही वाचा