नागपूर : भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (20 ऑक्टोबर) जाहीर केलीय. या यादीत भाजपाच्या 99 उमेदवारांची नाव आहेत. बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपानं जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भातील 23 मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
विदर्भातील 23 उमेदवारांना संधी : भाजपानं जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 23 मतदारसंघांतील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 19 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर उर्वरित 4 ठिकाणी माजी आमदार किंवा इतर इच्छुकांना संधी देण्यात आलीय. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी, वर्धा जिल्ह्यातील देवळी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगावचा समावेश आहे.
10 मतदारसंघातील भाजपा आमदारांची धाकधूक वाढली : 23 मतदारसंघात भाजपानं आपले उमेदवार जाहीर केले असले, तरी विदर्भात भाजपाचे आमदार असलेल्या नागपूर मध्य, आर्णी, उमरखेड, गडचिरोली, अकोला पश्चिम, आकोट, मुर्तीजापुर, आर्वी, कारंजा आणि वाशिम या 10 मतदारसंघात भाजपानं त्यांचे विद्यमान आमदार असताना सुध्दा आज उमेदवार जाहीर केले नाही. त्यापैकी 8 विद्यमान आमदारांना भाजपानं वेटिंग वर ठेवलेत. तर 2 ठिकाणी भाजपाचे आमदार दिवंगत झाले आहे. तिथं भाजपाला नवीन उमेदवार शोधावे लागणार आहे.
एका विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं : आजच्या यादीत एका विद्यमान आमदाराचं टिकीट भाजपानं कापलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, त्या मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय भाजपानं घेतलाय. असं असलं तरी विदर्भात भाजपाचे आमदार असलेल्या 10 मतदारसंघात भाजपानं उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळं त्या ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल? नवे चेहरे आणले जातील? की ते मतदारसंघ मित्र पक्षांकडे जातील? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हेही वाचा