मुंबई Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (13 मे) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेनं आपल्या पक्षाला मतदान करावं, यासाठी राजकीय नेत्यांकडून मतदारांना आवाहन करण्यात येतंय. तर दुसरीकडं माध्यमांमध्ये नेत्यांकडून मुलाखतीचा सपाटा सुरू आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. तसंच आज ही मुलाखत सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आली. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मॅनेज मुलाखत दिली : यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ते म्हणालेत की, "एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत आहेत. उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. तसंच ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हानदेखील बावनकुळेंनी ठाकरेंना दिलंय.
हिंमत असेल तर याचीही उत्तरं द्या :
१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
४. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?
उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे. जय महाराष्ट्र!, असं बावनकुळेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळं या टीकेला ठाकरे गटाकडून कसं प्रत्युत्तर मिळेल, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा -
- आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; वडेट्टीवार, बावनकुळे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल - Code Of Conduct Violating Issue
- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी निवडणूक प्रचारात; "ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती" - Lok Sabha Election 2024
- शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी; बावनकुळेंचं थेट आव्हान - Lok Sabha Election 2024