मुंबई - कर्नल के.एस. खटाणा यांच्या ‘द गेम बिहाइंड सेफ्रॉन टेरर’ या पुस्तकावर आधारित ‘मॅच फिक्सिंग - द नेशन ॲट स्टेक’ हा सिनेमा १० जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून २६/११ मागील षडयंत्राचा उलगडा होणार आहे. विविध कारणामुळं ‘मॅच फिक्सिंग - द नेशन ॲट स्टेक’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्यामुळं अखेर या सिनेमाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या १० जानेवारी 2025 रोजी बहुचर्चित ‘मॅच फिक्सिंग - द नेशन ॲट स्टेक’ हा सिनेमा राज्यसह देशभर प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी गुर्जर यांनी दिली आहे. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कशावर आधारित आहे चित्रपट?
दरम्यान, आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. 2001 ते 2008 पर्यंत देशपातळीवर काय घडले? तसेच 26/11 हा आतंकवादी मुंबईवर हल्ला झाला. याचे प्लॅन..., नियोजन कशा प्रकारे करण्यात आलं होतं? या हल्ल्याचा कट कसा रचण्यात आला होता? या सर्वाचा उलगडा या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळणार असल्याचं निर्माती पल्लवी गुर्जर यांनी सांगितलं आहे. तसेच मागील काही दिवसांपासून देशात "हिंदू टेररिझम" हा शब्द रुजू होत आहे किंवा हिंदू आतंकवाद असं वातावरण तयार होतंय. तर ते कशाप्रकारे वातावरण तयार केलं गेलं. कसा नरेटिव्ह तयार केला गेला. आणि तो "हिंदू टेररिझम" खरंच आहे का? यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळं तुम्ही हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा, असं आवाहन निर्माती पल्लवी गुर्जर यांनी केलं आहे.
चित्रपट प्रदर्शनादरम्यान अनेक अडचणी...
पल्लवी गुर्जर 'द गेम बिहाइंड सेफ्रॉन टेरर' या पुस्तकाने प्रेरित होऊन हा सिनेमा साकारला आहे. यातील काही जी दृश्य आहेत ती सेन्सार बोर्डकडून आम्हाला कट करण्यास सांगितलं होतं. परंतु मी "हिंदू टेररिझम" ह्या शब्दावर मी ठाम राहिले. बाकी कोणतेही शब्द वगळले तरी चालेल पण आपण हा शब्द वगळू देणार नाही. यावर मी ठाम राहिले आणि हा शब्द चित्रपटात कायम राहिला. यानंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मला वाटलं होतं की, हा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गुन्हा दाखल होईल. मात्र ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला. चित्रपट देशातील विविध भागात जाऊन याचं शूटिंग केलं आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकारांची फळी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार गायकवाड यांनी केलं आहे तर किशोर कदम, विनीत कुमार सिंग, मनोज जोशी, राज अर्जुन असे अनेक प्रतिभावान कलाकार हा चित्रपटात दिसणार आहेत. सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, अनेक अडचणींचा सामना करत अखेर हा सिनेमा प्रदर्शित होत असताना आनंद होत असल्याचं निर्माती पल्लवी गुर्जर यांनी म्हटलंय.