शिर्डी : सोमवारी पहाटेच्या दरम्यान साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर साई संस्थान प्रशासनने कामाच्या शिफ्टमध्ये बदल करत पहाटे 4-12 ऐवजी सकाळी 6 ते दुपारी 2 दुसरी शिफ्ट आणि दुपारी 2 ते रात्री 10 आणि तिसरी शिफ्ट रात्री 10 ते सकाळी 6 असे बदल केले आहेत.
नवीन शिफ्टप्रमाणे काम सुरू : साई संस्थानमधील अनेक कर्मचाऱ्यांना रात्री-पहाटे बाहेर गावावरून प्रवास करावा लागतो. त्यांना येणाऱ्या अडचणीमुळं हा बदल करण्यात आल्याचं परिपत्रक संस्थानकडून काढण्यात आलय. मंगळवारपासून नवीन शिफ्टप्रमाणे काम सुरू झाल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
नव्या शिफ्टनुसार असं होणार काम : नव्या शिफ्टनुसार पहिली शिफ्ट सकाळी 6 ते दुपारी 2 असेल. दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते रात्री 10 असेल. तिसरी शिफ्ट रात्री 10 ते सकाळी 6 असेल. या नव्या वेळापत्रकामुळं कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी प्रवास करावा लागणार नाही. विशेषतः पहाटे 4 ते 6 या वेळेत प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे.
संस्थेचा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय : या बदलांबाबत माहिती देताना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं, "सोमवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून नवीन ड्युटी वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना रात्री आणि पहाटे प्रवास करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी काही महत्त्वाचे बदल लवकरच करण्यात येणार आहेत."
स्थानिकांच्या प्रतिक्रिया : शिर्डीतील स्थानिक नागरिक आणि साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलय. अनेक कर्मचाऱ्यांना पहाटेच्यावेळी दूरच्या गावी प्रवास करावा लागत असल्यानं त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळं हा बदल अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा -