पुणे- राज्य शासनाची गाजलेली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घेतला असल्याचं समोर आलंय. एवढंच नव्हे तर या योजनेचा लाभ इतर राज्यातील तसेच बांगलादेशी महिलांनीदेखील घेतल्याचं उघड झालंय. असं असताना आता सरकारच्या या लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका येऊन चारचाकी वाहन आहे का हे तपासणार आहेत आणि चारचाकी आढळून आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संबंधित महिलेला सोडावा लागणार आहे. असं असताना शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 75 हजार 100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झालंय.
75 हजारांहून अधिक महिलांच्या घरी चारचाकी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकी असलेल्या महिलांची यादी आलीय. या यादीत पुणे जिल्ह्यातील 75 हजार 100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झालंय. या यादीनुसार आता या महिलांची बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येणार आहे.
पडताळणीचे काम तत्काळ सुरू : पुणे जिल्ह्यासाठी दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडे आल्यात. त्यात पहिल्या यादीत 58 हजार 350 तर दुसऱ्या यादीत 16 हजार 750 अशी एकूण 75 हजार 100 वाहनधारकांची यादी प्रशासनाला मिळालीय. या यादीतील नावे तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना देऊन प्रत्यक्षात पडताळणीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग : महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शासनाकडून अगोदर स्वतःहून महिलांनी लाभ सोडवा, असे आवाहन केले होते, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पाऊल उचलण्यात आलंय.
हेही वाचा :