हैदराबाद : विद्युत खांब उद्योगात काम करणाऱ्या एका 27 वर्षीय व्यावसायिकाची अर्धवेळ नोकरी घोटाळ्याच्या नावाखाली तब्बल 57.75 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नगण्य ऑनलाइन कामासाठी सहज कमाईचं आमिष दाखवून, आरोपीनं व्यावसायीकाला नकळतपणे मोठा चुना लावला आहे. रक्कम हस्तांतरित केल्यानंतर व्यावसायीकाला फसवणूक झाल्याचं कळालं. त्यानंतर त्यानं सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर गुन्हे अधिकाऱ्यांनी आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कशी घडली घटना : या व्यावसायिकाला 16 ऑगस्ट रोजी टेलिग्रामवर अनसूया नावाच्या मुलीकडून एक संदेश आला होता, ज्यामध्ये त्याला अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली होती. आरोपींनी तीन तास ऑनलाइन कामासाठी दररोज 4 हजार 650 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. दोन दिवसांनंतर, अभिनया नावाच्या आणखी एका मुलीनं त्याच्याशी संपर्क साधला होता. तिनं व्यावसायीकाला सांगितलं की ती 'मँगो फॅशन' नावाच्या कंपनीची प्रतिनिधी आहे. तिनं व्यावसायीकाला डिजिटल वॉलेटमध्ये 10 हजार रुपये बोनस दिला होता. त्यानंतर व्यावसायीकानं कामाला सुरवात केली. व्यावसायीक प्रभावित झाल्याचं लक्षात येताच अभिनयनं त्याला जास्त परताव्यासाठी मँगो फॅशनमध्ये गुंतवणूक करण्यास राजी केलं. कालांतरानं, त्यानं घोटाळेबाजांनी दिलेल्या 11 बँक खात्यांमध्ये 58.06 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्याच्या वॉलेटमध्ये 76 लाख रुपये होते. तथापि, जेव्हा त्यानं रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फक्त 30 हजार 885 रुपये तो काढू शकला.
14 संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल : वारंवार पैसे काढण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्याला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यानं 29 ऑगस्ट रोजी सायबर क्राइम हेल्पलाइनशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. चौकशीनंतर, 24 डिसेंबर रोजी 14 संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अर्धवेळ नोकरीचे घोटाळे आता सामान्य होत आहेत, जिथं घोटाळेबाज मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या लोकांना लक्ष्य करताय. अशा घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी, नेहमी अनपेक्षित नोकरीच्या ऑफरची सत्यता तपासावी. कंपन्या कधीही आगाऊ पैसे किंवा गुंतवणूकीची मागणी करत नाहीत. पैशाची मागणी ही एक धोक्याची घंटा असते. जर तुम्हाला असे घोटाळे आढळले, तर संबंधितांना त्वरित कळवा जेणेकरून आर्थिक नुकसान टाळता येईल.
स्वतःचं संरक्षण कसं करावं :
पार्ट-टाइम नोकरी घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी, 'या' टिप्स फॉलो करा.
1. कंपनीबाबत माहिती गोळा करा : कंपनीचे अस्तित्व, प्रतिष्ठा आणि वैधता पडताळून पहा.
2. कंपनीबाबत संशोधन करा : कंपनीचे मागील कर्मचारी किंवा क्लायंटकडून माहिती घ्या.
3. नोकरीच्या अमिषापासून सावध रहा : नोकरीत फसवणून टाळण्यासाठी कंपनीशी संपर्क साधा. किंवा कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधा.
4. आगाऊ शुल्क भरू नका : कंपनीची वैधता पडताळल्याशिवाय कधीही शुल्क भरू नका किंवा पैसे गुंतवू नका.
5. सुरक्षित पेमेंट पद्धती वापरा : वायर ट्रान्सफर किंवा प्रीपेड कार्ड वापरणे टाळा आणि क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मसारख्या सुरक्षित पेमेंट पद्धती निवडा.
हे वाचलंत का :