छत्रपती संभाजीनगर Dhananjay Munde On Jitendra Awhad : दोन्ही पवारांमध्ये फूट पाडण्याचं आणि अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलं. आता भावनिक होऊन त्यांना फक्त राष्ट्रवादीत एकटच राहायचं आहे अशी टीका, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) तर्फे राज्यात रयतेचा मेळावा घेत असून त्यानिमित्तानं धनंजय मुंडे वेरुळ येथे आले होते. त्यावेळी स्वराज्य शपथ कार्यकर्त्यांना देण्यात आली. यावेळी भाजपाला कोणी किती नावं ठेऊ द्या, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महिलांचा सन्मान कोणी केला असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत अशी स्तुती सुमन त्यांनी उधळली.
आव्हाड यांनीच फूट पाडली : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत शरद पवार नसते तर अजित पवार नसते अशी भावनिक टीका केली होती. त्यावर बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, आज जितेंद्र आव्हाडांना शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल भावनिकता निर्माण झाली आहे. परंतु खऱ्या अर्थाने शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अंतर आणायचं काम कोणी केलं असेल तर, ते आव्हाड यांनी केलंय, याचे अनेक पुरावे साक्षी देण्यासाठी माझ्यासहित अनेक जण पुढे येतील.
भावनिक प्रयत्न : आज तुम्हाला ही भावनिकता एवढ्यासाठीच पाहिजे की, शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटील, सुप्रिया सुळे यासुद्धा नसावेत स्वतः फक्त एकटे आव्हाड पाहिजेत. यासाठी हा भावनिक भाबडा प्रयत्न त्यांनी आमच्यावर टीका करत केला. त्यावेळी त्यांची सही त्या वेळेच्या एकूण 53 आमदारांच्या सोबत भारतीय जनता पार्टीसोबत जाताना, शरद पवार यांच्या संमती सहित होती की नव्हती याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. असे अनेक प्रसंग आहे ते कधीतरी सांगता येईल. आव्हाड हे भावनिक होण्याची परिस्थिती कुटुंबात निर्माण करणाऱ्या पैकी ते एक आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
हेही वाचा -