शिर्डी (अहमदनगर) Devendra Fadnavis On Ladki Bahin : 'लाडकी बहीण योजने'वरुन सध्या राजकारण तापलंय. या योजनेविरोधात विरोधक मत मांडत आहेत, तर ही योजना कशी फायद्याची आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेवरुन विरोधकांचा 'बाप' काढलाय. तर खासदार प्रणिती शिंदे यांनाही प्रत्युत्तर दिलंय.
पैसा तुमच्या बापाचा नाही : "'लाडकी बहीण योजनाट बंद पडावी यासाठी काँग्रेसवाल्यांनी कोर्टात धाव घेतली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर महायुतीच्या 'लाडकी बहीण योजने'सह सर्व योजना रद्द करण्याची भाषा आदित्य ठाकरेंनी केली. तर ही लाचखोर योजना असल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या. मात्र, हा सरकारचा पैसा असून कुणाच्या बापाचा पैसा नाही. त्यामुळं लाचखोर म्हणण्याचा अधिकार नाही," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह खासदार प्रणिती शिंदे यांना सुनावलं. येत्या काळात सावत्र भावांपासून सावध राहण्याचा सल्लाही फडणवीस यांनी महिलांना दिला.
योजना वाढीव पद्धतीने राबवणार : आतापर्यंत १ कोटी ९० लाख महिलांच्या खात्यावर पैसे पोहोचले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात राज्यातील २ कोटी ५० लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. तसंच यापुढंही सर्व योजना तसंच विशेषतः 'लाडकी बहीण योजना' वाढीव पद्धतीने सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
कामांचा वाचला पाढा : "केंद्र सरकारनं कांदा निर्यातीचा निर्णय घेतला. तसंच कापूस, ऊस, सोयाबीनला चांगला भाव मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सुमारे ५० वर्षे रखडलेला निळवंडे प्रकल्प सरकारनं मार्गी लावला. लवकरच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडं वळवून ५५ टीएमसी पाणी नाशिक, नगर जिल्ह्यासह मराठवाड्याकडं वळवून दुष्काळमुक्त करण्याचं काम केलं जातंय. समृद्धी मार्गामुळं दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. लवकरच नवीन विमान तळाचे कामही सुरू होत आहे," असं फडणवीस यांनी सांगितलं.
फडणवीसांनी घेतलं साईबाबांचं दर्शन : देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी शिर्डीत आले होते. शिर्डीसह जिल्ह्यातील अनेंक विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांच्या मंदिरात जावून साई समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर संस्थानच्या वतींनं शाल , साई मूर्ती देवून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
भूमिपूजनासह विविध विकासकामांचं उद्घाटन : शिर्डी औद्योगिक वसाहत, शिर्डी थीम पार्क आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील अन्य विकासात्मक कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. तसंच 'लाडकी बहीण योजने'च्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन शिर्डीत करण्यात आलं.
हेही वाचा
- मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे; देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, पोलीस म्हणाले... - Devendra Fadnavis Office Attack
- मोदींचा दौरा पुढे ढकलल्यानंतर तापलं राजकारण, मेट्रो सुरू करण्याकरिता महाविकास आघाडीचं आंदोलन - pune metro inauguration
- काँग्रेसला मुंबई अन् विदर्भात हव्यात सर्वाधिक जागा; राज्यातील सत्ता स्थापनेसाठी विदर्भ ठरणार निर्णायक - Congress demands 45 seats Vidarbha