मुंबई-काँग्रेसच्या माजी आमदार वर्षा गायकवाड या खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर आता धारावी विधानसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. धारावी मतदारसंघातील या जागेसाठी काँग्रेस पक्षानं इच्छुकांचे अर्ज मागवले होते. या इच्छुकांमध्ये मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष संदेश कोंडविलकर, वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड आणि त्यांचे बंधू तुषार गायकवाड यांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दिले आहेत.
पक्षांतर्गत कलह उघड - धारावी मतदारसंघातील आता उमेदवारीवरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह समोर आला आहे. वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधील एका गटानं जोरदार विरोध केला आहे. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष कोंडविलकर यांनी ज्योती गायकवाड यांना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत कलह या मतदारसंघात उफाळून येण्याची शक्यता आहे.
कोण आहेत ज्योती गायकवाड? ज्योती गायकवाड गिरी गोसावी या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत. त्या व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्यांनी धारावी येथील सक्रिय राजकारणात भाग घेतला आहे. वर्षा गायकवाड यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. तर शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराची यंत्रणासुद्धा त्यांनी राबवली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनिल देसाई यांनी ज्योती गायकवाड यांना धारावीच्या संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केले होते.
धारावी मतदार संघावर आमचा हक्क - या संदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "धारावी हा मतदार संघ दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांनी अतिशय कष्टाने बांधला आहे. या मतदारसंघावर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत केली आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून निश्चितच माझेही मत विचारात घेतले जाईल. हा मतदारसंघ कोणाला द्यावा? हा मतदारसंघ आमच्याच घरात राहायला हवा," असे माझे स्पष्ट मत आहे.
दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता- हरियाणा राज्याची विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 ला संपुष्टात येणार आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची विधानसभांची मुदत जवळपास सारख्याच कालावधीत संपत असल्यानं या दोन्ही राज्यांची निवडणूक एकत्र होऊ शकते. मंत्रालयातील सूत्राच्या माहितीनुसार राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होऊ शकतात.
हेही वाचा-