बीड : केज तालुक्यातील मास्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. संतोष देशमुख हत्याकांडामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. असं असताना आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बीड इथं भेट देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी फरार आरोपीला लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.
रामदास आठवले यांनी दिली भेट : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख खून प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की "या घटनेला अनेक दिवस झाले, मात्र अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे स्टेटमेंट देखील घेतले नाही. ताबडतोब त्या कुटुंबाचा जबाब घ्यायला पाहिजे होता. फरार तीन आरोपी आणि मुख्य सूत्रधार यांना ताबडतोब अटक करा. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस अत्यंत अॅक्टिव्ह आहे."
प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही, सूत्रधारांना पकडणं आवश्यक :"या प्रकरणामध्ये एवढा वेळ का होतोय हे सांगता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोणाला सोडमार नसल्याचं हाऊसमध्ये सांगितलं आहे. फक्त प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही. सूत्रधारांना लवकर पकडणं अत्यंत आवश्यक आहे. तीन आरोपींना पकडण्यासाठी एवढा वेळ का लागतो. पोलिसांनी कुणाच्या दबाखाली काम करू नये. अशोक सोनवणे जो वॉचमन होता, त्याला जी मारहाण झाली त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्या वेळेला अॅट्रॉसिटी लावली असती, तर अशी घटना घडली नसली. लवकरात लवकर या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे," असं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :