पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडं विविध राज्यातून बनावट दारू देखील विविध शहरात येत असल्याच्या घटना समोर येत आहे. असं असताना पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि निगडी परिसरात पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीची तब्बल एक कोटी २० लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आलीय. तसेच नऊ आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय. तसेच विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या आणि ५ वाहनं जप्त करण्यात आल्याची माहिती, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.
बनावट दारूवर नियंत्रण आणण्यासाठी पथके तयार : चरणसिंग राजपूत म्हणाले की, "नाताळ आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रमाणात मद्य पार्टीचं आयोजन केलं जातं. या कालावधीमध्ये कर बुडवून आणलेली विदेशी दारू, परराज्यातील दारू, बनावट दारूवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे जिल्ह्यात पथके तयार करण्यात आली आहेत."
मुद्देमाल केला जप्त : रविवारी एका संशयित वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटी मद्याचे तीन बॉक्स मिळून आले. यावेळी चालकास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. चालकाने दिलेल्या माहितीनुसार, नसरापूर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. त्यावेळी तिथे एका ट्रकमधून गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गाडीतून उतरवून गोडाऊनमध्ये ठेवले जात होते. त्यास ताब्यात घेऊन ट्रक आणि पत्र्याचा शेडची तपासणी करण्यात आली. त्यावेळेस ट्रकमध्ये विटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळशाची पावडर आणि गोवा बनावटीचे विविध ब्रांडचे विदेशी मद्याचे बॉक्स हे थर्माकोलच्या बॉक्समध्ये मिळून आले. तेथील सर्व मद्याचा साठा, कार, ट्रक, गोवा बनावटीच्या विविध ब्रान्ड विदेशी मद्याच्या १७१० बाटल्या (११६ बॉक्स) आणि इतर असा एकूण रु ५१,९५,१७० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चार आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजपूत यांनी दिली.
९ आरोपींना अटक : दुसऱ्या एका कारवाईत निगडी गावाच्या हद्दीत पवळे ब्रिज खाली भक्ती शक्ती चौक पुणे देहु रोडवर गोवा राज्यात विक्री करीता असलेलं विदेशी मद्य आणि बिअर असा एकूण रु. १,३४,२३० किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर निळ्या रंगाच्या ट्रव्हल कंपनीच्या खासगी बसमधून (क्र. एमएच १२ व्ही दी ९३४५) हा साठा जप्त करून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सदरचा मद्यसाठा हा खडकी औंध रोड खडकी स्टेशन जवळ वितरीत करणार असल्याचं समजलं होतं. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन मद्यासह एकूण ०५ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यासोबतच्या २ दुचाकी आणि एक बस जप्त करण्यात आली. यामध्ये विदेशी दारुच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या १२६ सिलबंद बाटल्या, बिअर ५०० मि.ली क्षमतेच्या २४ सिलबंद बाटल्या. सदर गुन्ह्यामध्ये असा एकूण रु. ६८, ३७,७३०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा एकूण दोन्ही गुन्ह्यातील मिळून एकूण रु 1,20,32,900/- (एक कोटी वीस लाख बतीस हजार नऊशे) एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच विदेशी मद्याचा 1668 बाटल्या आणि ५ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राजपूत यांनी दिली.
हेही वाचा -