कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते माजी खासदार गोविंदा (Actor Govinda) यांनी इचलकरंजीत आज हजेरी लावली होती. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशाच्या प्रमुख पदावर विराजमान करण्यासाठी महिलांनी पाठबळ द्यावं, असं आवाहन गोविंदा यांनी केलं. तर खुल्या व्यासपीठावर त्यांनी केलेल्या धम्माल डान्सला महिलांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा : इचलकरंजीतील पंचरत्न मंगल कार्यालयात ताराराणी पक्षाच्यावतीनं आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते माजी खासदार गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला संबोधित करताना गोविंदा यांनी पुन्हा एकदा देशात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यातून महायुतीचे खासदार निवडून द्यावेत असं आवाहन केलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा अशी साद गोविंदा यांनी उपस्थित महिलांना घातली. गोविंदा यांनी खास आपल्या शैलीत आपल्या चित्रपटातील डायलॉग सादर करून मेळाव्याला जमलेल्या महिलांना पंतप्रधान मोदी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी आपण या ठिकाणी आलो असल्याचं सांगितलं.
गोविंदा यांचा भन्नाट डान्स : "खुदगर्ज" या हिंदी चित्रपटातील "आपके आ जाने से" या गाण्यावर खुल्या व्यासपीठावर गोविंदा यांनी ठेका धरला. खास आपल्या शैलीत केलेला या डान्सला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्या आणि शिट्ट्यांनी सभागृह दणाणून सोडलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी महिला वर्गावर असल्याचं सांगून नारीशक्तीची ताकद दाखवून द्या, असं आवाहन यावेळी गोविंदा यांनी केलंय. तर सिने अभिनेते गोविंदाला पाहण्यासाठी आणि सेल्फी फोटो काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, राहुल आवाडे, मोश्मी आवाडे, किशोरी आवाडे, प्रकाश दातवाडे उपस्थित होत्या.
अंबाबाईला साकडं : इचलकरंजीतील कार्यक्रम झाल्यानंतर गोविंदा यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी आणि महायुतीतील उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं साकड अंबाबाईला गोविंदा यांनी घातलं. यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -
- कलंकित काँग्रेस सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत आहे, पण इंडिया आघाडी दोन टप्प्यातच पराभूत : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Lok Sabha Election 2024
- 2014 नंतर 17 लाख हिंदू कुटुंबांनी नागरिकत्व का सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भागवत यांना सवाल - Lok Sabha Election 2024
- "गुजरातला उद्योगधंदे पळवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण...", नाना पटोलेंचा हल्लाबोल - Nana Patole