पुणे EAM S Jayshankar : देशाच्या परराष्ट्र धोरणात 2014 पासून बदल झाला असून दहशतवादाशी सामना करण्याचा हा मार्ग असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. तसंच आजघडीला पाकिस्तानसोबत संबंध ठेवणं सर्वात कठीण असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. जर्नी ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया या विषयावर समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, युवा स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पुनीत जोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
20 हजार मुलं भारतात परत : परराष्ट्र विषयक धोरणांचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असतो. साडेतीन कोटी भारतीय जगातील विविध देशांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. या नागरिकांना हा विश्वास मोदींच्या गॅरंटीतून मिळतो. युक्रेनहून 20 हजार मुलं भारतात परत येऊ शकली, ही मोदींची गॅरंटी आहे. मोबाईलमधील 5 जी तंत्रज्ञान स्वदेशी आहे. आपण 2 जी साठी युरोपवर आणि 3 जी व 4 जी साठी चीनवर अवलंबून होतो. परंतु 5 जी मेड इन इंडिया आहे. देशातील बुद्धिमत्तेवर विश्वास आहे. त्यांना देशात अधिकाधिक संधी दिल्या पाहिजेत. कमीत कमी नियम, पायाभूत सुविधा, स्टार्ट अप, इज ऑफ डूईंग बिझनेस असं वातावरण बनत आहे. भारतीय नागरिक देशासाठी योगदान देण्याची वेळ येते, तेव्हा मागं राहात नाहीत. पुढील 25-30 वर्षे संधीची आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक करावी लागेल. यासाठी भारताबाहेर गेलेले भारतीय नागरिक उपयोगी येतील, असं देखील यावेळी एस. जयशंकर म्हणाले.
भारत दबावात दबत नाही : यावेळी बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "भारत कसा पुढं जाईल याचा आम्ही विचार करतो. आमचा आत्मविश्वास देशाला विकसित भारताकडं नेणारा आहे. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. गेल्या चार वर्षांत भारताची संस्कृती, वारसा याबद्दल देशातील नागरिकांमध्ये स्वयंजागृती झालीय. 'इंडिया' पेक्षा अधिक भारताची विचारधारा आहे. हा भारत दबावात दबत नाही निर्णय घेतो आणि अंमलात आणतो, हा बदल या दशकात झालाय. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत पश्चिमी संस्कृतीतील उदाहरणं दिली जातात. आपण आपल्या इतिहासातील, संस्कृतीतील उदाहरणं दिली पाहिजे, ज्यामधून शिकायला मिळेल."
अमेरिकेत सहयोग मिळवण्यात यश : ते पुढं म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत जग कनेक्टेड झालं. मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी वाढलीय. आपली मुलं बाहेर शिकायला जातात. त्यांच्यावर तणाव किंवा संकट असू शकतात. कोविड काळात या मुलांना देशात परत आणलं आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात आपण रशियाकडून पोल खरेदी केले, असा निर्णय घेतला तर तेलाच्या, पोलच्या किमती वाढल्यानं महागाई वाढली असती. त्याचा परिणाम महागाई वाढून प्रत्येकावर झाला असता. डिप्लोमसी आणि आर्थिक धोरण यांच्या एकत्रिकरणातून अमेरिकेशी विश्वासार्ह संबंध प्रस्थापित करता आले. आरोग्य, पर्यटन, फोन, तेल आदी क्षेत्रात अमेरिकेला सहकार्य करणं भाग पडलं. कोरोनाच्या लस निर्मितीसाठी 40 देशांतील सप्लाय चेनवर अवलंबून राहावं लागत होतं. यात अमेरिकेचा सहयोग मिळविण्यात यश मिळविलं."
हेही वाचा :