मुंबई - International Children's Book Day 2024 : 'आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन' 1967 मध्ये सुरू झाला. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना पुस्तकांच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आहे. हा दिवस दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मुलांना अधिकाधिक पुस्तकं वाचण्यासाठी अधिक उत्साही करण्याच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवसाच्या माध्यमातून अनेकजण मुलांना अभ्यासात रुची आणि पुस्तकांचे महत्त्व सांगतात. याशिवाय त्यांना अधिकाधिक पुस्तके वाचण्याचा सल्ला देखील देतात. हा दिवस साजरा करण्यासाठी, लोक विविध कार्यक्रम आयोजित करतात, जसे की पुस्तक मेळावे, पुस्तक संबंधित उपक्रम, पुस्तक वितरण कार्यक्रम आणि याद्वारे पुस्तक हा मित्र असल्याचं देखील सांगताना दिसतात.
'आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिना'चं महत्त्व : हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केल्यानं जगभरातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळते. 'आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन' मुलांच्या पुस्तकांच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी समर्पित आहे. या वर्षीची थीम कल्पनाशक्ती आहे, जी मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करण्यास आणि जगाला नवीन मार्गानं पाहण्यास प्रोत्साहित करते. यावर्षी 2024 मध्ये, जपान आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनाचा यजमान देश आहे. आज हॅन्स ख्रिश्चन अँडरसनचा वाढदिवस देखील आहे. हॅन्स ख्रिश्चन अँडरसन हे मुलांच्या पुस्तकांचे सुप्रसिद्ध डॅनिश लेखक आहेत. त्यांनी 'द एम्परर्स न्यू क्लोथ्स', 'द लिटिल मर्मेड', 'द अग्ली डकलिंग' आणि 'थंबेलिना' यासह काही प्रसिद्ध बालकथा लिहिल्या आहेत.
छोट्या मुलांना पुस्तक वाचण्याबद्दल प्रोत्साहित करा : 'आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन' साजरा करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. तुमच्या मुलांना तुम्ही पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाऊ शकता. त्यांना स्वतःच्या कथा लिहिण्यास आणि चित्रे काढण्यास प्रोत्साहित करू शकता. 'आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिना'बद्दल तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबीयांशी बोला, जेणेकरून तेदेखील आजूबाजूच्या मुलांना या दिवसाबद्दल सांगतील. 'आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन' हा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची उत्तम संधी आहे. हा दिवस मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करण्यास आणि जगाला नवीन मार्गाने पाहण्यास प्रोत्साहित करु शकतो.
वाचनाचे फायदे
वाचनामुळे माहिती मिळते.
पुस्तकांमुळे सर्जनशीलतेला प्रेरणा मिळते.
तुमचा शब्दसंग्रह वाढतो.
तणाव कमी होतो.
नैराश्याची लक्षणे दूर करण्यास मदत होते.
वाचन हे ज्ञानवर्धनाबरोबरच मनोरंजनाचंही माध्यम आहे.
पुस्तक सहानुभूती शिकवते.
हेही वाचा :