हैदराबाद Cinnamon Control Sugar Level : मधुमेहाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहांनांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक याच्या कचाट्यात अडकले आहेत. एकदा का हा आजार झाला तर आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. काहीही खाण्यापूर्वी एक किंवा दोन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. नियमित पथ्य पाडून देखील मधुमेह नियंत्रित ठेवण्यास आपल्याल अपयश येतं. परंतु आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रित ठेवणाऱ्या अशा घटकाबद्दल माहिती देणार आहोत जे तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे.
आपल्या स्वयंपाकघारात सहज उपलब्ध असलेल्या आरोग्यवर्धक घटकांपैकी एक घटक म्हणजे दालचिनी. साधारणतः सर्वांच्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यामध्ये दालचिनी उपलब्ध असते. हा घटक आपल्या जेवणाची चव तर वाढवतोच परंतु अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून देखील ओळखला जातो. यात असलेला अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. तसंच कार्बोहायड्रेट्स, सोडियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, प्रथिने, जीवनसत्त्व ए, सी तसंच फॉस्फरस पुरेशा प्रमाणात असतात. दालचीनीमुळे फक्त वजनच कमी होत नाही तर मधुमेहासारखा आजार देखील नियंत्रणात रहातो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- आहारतज्ज्ञांच्या मते : काही अभ्यासामधून असं सिद्ध झालं की, दालचिनीमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता आहे. प्रख्यात आहारतज्ज्ञ डॉ. श्रीलता यांच्या मते, दालचिनीमध्ये असलेले नैसर्गिक इन्सुलिन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे दालचिनीचा वापर मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
दालचिनीमध्ये फ्लेव्होनॉइड्ससारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसंच अँटिऑक्सिडेंट, अँटी-ट्यूमर, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म देखील असतात. पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील चरबी नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची क्षमताही दालचिनीमध्ये असते. दातदुखी आणि जळजळ यासारख्या आजारांवरही याचा वापर फायदेशीर असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. श्रीलता सांगतात.
- अभ्यासानुसार : टाईप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्येही दालचिनी प्रभावीपणे काम करते. कॅलिफोर्नियातील काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये दालचीनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. 543 टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी काहींना दररोज 120 मिलीग्राम ते 6 ग्रॅम दालचिनी देण्यात आली, तर काहींना नियमित गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतरच्या विश्लेषणात असं आढळून आलं की, ज्यांनी दालचिनीचं सेवन केलं त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी गोळी घेणाऱ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे नियंत्रणात होती.
दालचिनीचे फायदे
- चयापचय सुधारते
- शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते
- उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी उपयुक्त
- दातदुखी आणि हिरडे दुखीवर उत्तम उपाय
- हृदयाचे आरोग्य सुधारते
- यातील दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करते
- रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते
- वजन नियंत्रित राहते
- व्हायरल इन्फेक्शन,सर्दी आणि घसादुखीपासून आराम
कसं घ्यावं : 1/4 चमचा दालचिनी पावडर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात उकळून प्यायल्यानं इन्सुलिनची पातळी वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. अनेक संशोधनातून असं लक्षात आलं की, मधुमेहाचे रुग्ण सकाळ-संध्याकाळ दालचिनीचे पेय घेतल्यास त्यांची साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )