मुंबई - मिस युनिव्हर्स 2024ची स्पर्धा17 नोव्हेंबर रोजी पार पडली. आता पुन्हा एकदा जगाला नवीन मिस युनिव्हर्स मिळाली आहे. यावेळी मिस युनिव्हर्स 2024चा खिताब मिस डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजीर थेलविगनं जिंकला आहे. तिनं मिस युनिव्हर्स खिताब जिंकून तिच्या देशाचं नाव जगात केलं आहे. दरम्यान या स्पर्धेत फर्स्ट रनर-अप नायजेरियाची चिडिम्मा अडेटशिना, सेकन्ड रनर-अप मॅक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान आणि थर्ड रनर अप थाईलॅंडची ओपल सुचाता चुआंगश्री आहेत. याशिवाय चौथ्या क्रमांकावर व्हेनेझुएलाची इलियाना मार्केझ असून ही स्पर्धा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया केजीर : सोशल मीडियावर अनेकजण नवीन बनलेली मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया केजीरवर अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत. या स्पर्धेत भारताचा पराभव झाला आहे. भारताच्या रिया सिंघानं टॉप 30मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. अंतिम फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान गेल्या वर्षीच्या निकारागुआनमधील मिस युनिव्हर्स शेनिस पॅलासिओसनं व्हिक्टोरिया केजीरच्या डोक्यावर स्वतःच्या हातांनी मुकुट घालून दिला. यावर्षीची मिस युनिव्हर्स 2024 सौंदर्य स्पर्धेची 73वी आवृत्ती शनिवारी मेक्सिको सिटी, मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती.
भारतानं तीन वेळा जिंकला मिस युनिव्हर्सचा खिताब : या स्पर्धेत125 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. हा ताज प्रत्येक देशासाठी महत्वाचा असतो. मिस युनिव्हर्सचा ताज खूपच खास मानला जातो. हा मुकुट महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतिनिधित्व करत असून यासाठी प्रत्येक देशामधील स्पर्धक खूप मेहनत करतात. याआधी तीन वेळा मिस युनिव्हर्सचा खिताब भारताच्या नावावर झाला आहे. 1994 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं भारतासाठी पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. यानंतर लारा दत्ता आणि हरनाज संधू यांनीही हा खिताब पटकवला आहे.
व्हिक्टोरिया केजीर कोण आहे? : आपल्या सौंदर्यानं मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी व्हिक्टोरिया केजीर ही एक वकील आहे. याशिवाय ती खूप चांगली डान्सर देखील आहे. व्हिक्टोरियाच्या डोक्यावर मुकुट घातल्यानंतर तिनं म्हटलं की, "माझी जीवनशैलीत कधीही बदल होणार नाही. आजपर्यंत मी ज्या प्रकारे जगत होते, तसेच भविष्यातही राहीन." पुढं तिनं म्हटलं, "आपण आपल्या चुकांमधून खूप काही शिकत असतो. दररोज आपण काहीतरी नवीन शिकतो आणि याच गोष्टी आपल्याला भविष्यात घेऊन जातात, त्यामुळे मी दररोज त्यानुसार जगते. स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करते. मला काहीही बदलायचे नाही. मी जशी आहे तशीच स्वत:ला स्वीकारते."
मिस युनिव्हर्स 2024च्या फायनलमध्ये ज्युरी कोण होते : ज्युरी पॅनेलमध्ये फॅशन, मनोरंजन क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा समावेश होता. यात कॅमिला गुइरीबिटी, जेसिका कॅरिलो, मायकेल सिन्को, एमिलियो एस्टेफान, इवा कॅवल्ली, नोव्हा स्टीव्हन्स, फारिना, गॅरी नादेर, गॅब्रिएला गोन्झालेझ आणि जियानलुका वाची हे होते.
हेही वाचा :