मुंबई - 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' हे दोन बॉलिवूडचे मोठे चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी रिलीज झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई करत असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर 'सिंघम अगेन' हा 2024 मधील कमाईमध्ये दुसरा सर्वाधिक ओपनिंग हिंदी चित्रपट बनला आहे. 2024 मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट म्हणजे 'स्त्री 2'. दम्यान, 'भूल भुलैया' हा 2024 मधील तिसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट म्हणून चर्चेत आला आहे.
'सिंघम अगेन' हा अजय देवगणच्या आणि 'भूल भुलैया 3' हा कार्तिक आर्यनच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' ने रिलीजचे तीन दिवस पूर्ण केले असून पहिला विकेंड पार पडला आहे. या दोन्ही चित्रपटांनी एकूण कमाई किती केली हे जाणून घेऊयात.
'सिंघम अगेन' वीकेंड कलेक्शन - रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या मल्टीस्टारर चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ भूमिका करताना दिसत आहेत. सिंघम अगेन चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 43.70 कोटी रुपयांसह आपले खाते उघडलं. दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी रुपये आणि रविवारी 35 कोटी रुपये जमा झाले आहेत.
'सिंघम अगेन'ने 100 कोटींचा टप्पा ओलांडला असून पहिल्या वीकेंडमध्ये 121 कोटी रुपये कमावले आहेत. 'सिंघम अगेन'चे दोन दिवसांचे कलेक्शन 88.20 कोटी रुपये आहे. पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा टप्पा पार केला असा सिंघम अगेन हा अजय देवगणचा पहिला चित्रपट ठरला आहे.
'भूल भुलैया' 3 वीकेंड कलेक्शन - दुसरीकडे, हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया' देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित स्टारर चित्रपट 'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. 'भूल भुलैया 3' ने बॉक्स ऑफिसवर 36.60 कोटी रुपयांचे खाते उघडले. 'सिंघम अगेन'समोर 'भूल भुलैया 3' भरपूर कमाई करत आहे.
'भूल भुलैया 3'ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 32 ते 33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये शनिवारी मोठी भरारी घेतली होती, तर रविवारी चित्रपटाची कमाई 10 ते 15 टक्क्यांनी घसरली. 'भूल भुलैया 3' चे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन 104 कोटी रुपये झाले आहे. 'भूल भुलैया'ने शनिवारी ३६.५० कोटी रुपये जमा केले होते. सॅकनिल्कनुसार, चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन 72 कोटी रुपये आहे.
सॅकनिल्कच्या मते, 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' ने गेल्या तीन दिवसांत मिळून 225 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' या दोन्ही चित्रपटांनी पहिल्या वीकेंडमध्येच १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या दोन्ही चित्रपटांची सोमवारी कसोटी आहे. आता यात कोण बाजी मारतो हे पाहावे लागेल.