मुंबई Gela Madhav Kunikade Natak Relaunch : आपल्या विनोदी अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर गेली सुमारे चार दशकं गारुड घालणारे अभिनेता प्रशांत दामले यांचा प्रसिद्ध ‘अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलॉग पुन्हा एकदा रंगभूमीवर ऐकायला मिळणार आहे. कारण 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा एका रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यास येतंय. हे नाटक 15 जूनपासून रसिकांच्या भेटीला येत असल्याची माहिती प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
15 जूनला होणार शुभारंभ : 7 डिसेंबर 1992 ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर 1802 प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्ष या नाटकानं 'ब्रेक' घेतला होता. पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या भेटीला येतंय. 'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झालीय. 'गेला माधव कुणीकडे' या विनोदी नाटकानं अनेक वर्ष रसिकांचं मनोरंजन केलं. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या दोघांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगवर 'पब्लिक फुल टू फिदा' झाली. 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलाॅग आजही मराठी रसिकांच्या मनात घर करुन आहे.
"सुरुवातीपासूनच या नाटकाची लोकप्रियता वाढत गेली. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ 15 जून रोजी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी 4.00 वाजता होणार आहे. तर तिकीट विक्रीचा शुभारंभ 1 जूनपासून फक्त ‘तिकीटालय’ अॅप वर होईल"- अभिनेता प्रशांत दामले
केवळ 63 प्रयोग होणार : वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन महिलांशी लग्न केल्यामुळं ते लपवण्यासाठी निर्माण झालेला पेच आणि त्यातून आपसूकपणे निर्माण होणाऱ्या अनेक विनोदी प्रसंगामुळं रसिकांना हास्याची मेजवानी नाटकातून मिळते. मुख्य भूमिकेत प्रशांत दामले आहेत. तर विनय येडेकर, नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख आणि अक्षता नाईक हे कलाकार आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत. "मायबाप रसिकांसाठी 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना मला अतिशय आनंद होत आहे. तर केवळ रसिकांच्या आग्रहाखातर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहे. हे नाटक नवीन पिढीसाठी मेजवानी असणार आहे. हे माझं पहिलं सुपरहिट नाटक होते. या नोकरीच्या जोरावरच नोकरी सोडली होती. याचे फक्त 63 प्रयोग होतील. 63 प्रयोग कशामुळे तर हे माझे वय आहे," असंही चिरतरुण अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- ज्येष्ठ नाटककार सुरेश खरेंच्या लेखन कारकीर्दीचा सन्मान, ‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन साजरा - Suresh Khare
- 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' जाहीर, म्हणाले ''ऊर्जा मिळाली, अजून बरंच काही करायचं बाकी''
- पुरुषोत्तम बेर्डे 'मुक्काम पोस्ट आडगाव'मधून गावरान तडका देण्यासाठी सज्ज