मुंबई Miss Universe India : ट्रान्स वुमन नव्या सिंह ही प्रतिष्ठित अशा 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024' स्पर्धेकरता महाराष्ट्रातील 11 अंतिम स्पर्धकांपैकी एक म्हणून निवडली गेली आहे. त्यामुळं सर्व स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातील 100 स्पर्धकांमध्ये ती अंतिम फेरीत सहभागी झाली होती. त्यानंतर आता 11 सप्टेंबर रोजी ती विविध राज्यांतील स्पर्धकांशी स्पर्धा करणार आहे. नव्याचा प्रवास हा केवळ सौंदर्याबद्दल नाही तर इतिहासाच्या पुनर्लेखनाचा आहे. कारण या वर्षी पहिल्यांदाच ट्रान्स वूमन या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. नव्यासोबत चेन्नई आणि दिल्लीतील इतर दोन स्पर्धक सिसजेंडर स्त्रियांशी स्पर्धा करत आहेत. त्यामुळं सर्वांचंच लक्ष या स्पर्धेकडं असणार आहे.
काय म्हणाली नव्या? : 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024' स्पर्धेसाठी अंतिम स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर नव्या म्हणाली, "ट्रान्स वूमनचे स्वागत करणाऱ्या व्यासपीठाचा भाग बनणे हे केवळ माझ्यासाठीच नाही तर दुर्लक्षित झालेल्या सर्वांसाठी एक मोठं पाऊल आहे. यातून हे दाखवलं जातंय की आपण आता एका समान समाजाकडं वाटचाल करतोय. मला आशा आहे की माझा प्रवास इतरांना त्यांचं वेगळेपण आत्मसात करण्यास आणि जगात त्यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी न थांबता संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देईल."
असा होता बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास : नव्याचा जन्म बिहारमधील कटिहार येथे झाला. तिला किशोरवयात जेंडर डिस्फोरियाचा अनुभव आला आणि 2011 मध्ये ती मुंबईला आली आणि इथंच तिनं तिची खरी ओळख पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी सेक्स रीअसाइनमेंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बिहारपासून फॅशन जगतातील ग्लॅमर आणि ग्लिट्झपर्यंतचा तिचा प्रवास 2016 मध्ये सुरू झाला. तेव्हा तिनं लॅक्मे फॅशन वीक या कार्यक्रमात सहभागी होणारी एकमेव ट्रान्स वुमन म्हणून तिनं पदार्पण केलं.
सुष्मिता सेनकडून मिळाली प्रेरणा : 30 वर्षांपूर्वी 1994 मध्ये सुष्मिता सेनच्या मिस युनिव्हर्स विजयासंदर्भात बोलताना नव्या म्हणाली, “सुष्मिता सेन नेहमीच माझी प्रेरणा राहिली आहे. मी तिची स्पर्धा पाहिली आणि तिचा प्रवास देखील जवळून पाहिलाय. सध्या मला देखील थोडी भीती वाटत आहे. पण मी रोज स्वत:ला आठवण करून देते की, आज एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेली सुष्मिता तिच्या आव्हानांवर मात करू शकली, तर मीही करू शकेन."