मुंबई - Mirzapur 3 : मागील सीझनवर आधारित, 'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरीजनं तिसऱ्या सीझनसह उंच भरारी घेतली आहे. ही सीरीज जागतिक स्तरावर लोकप्रिय झाली आहे. या क्राईम ड्रामानं प्राईम व्हिडिओच्या लॉन्चिंग वीकेंडला भारतीय इतिहासातील सर्वात जास्त पाहिलेला शो म्हणून विक्रम केला आहे. या शोनं प्रचंड जागतिक यश मिळविलं आहे. लॉन्चच्या आठवड्याच्या शेवटी, हा शो भारत, कॅनडा, यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, यूएई, आणि मलेशियासह 85 हून अधिक देशांमध्ये 'टॉप 10' यादीत आला आहे. 'मिर्झापूर' सीझन 3 च्या यशानंतर प्राइम व्हिडिओ शोच्या पुढील भागावर देखील काम करत आहे.
'मिर्झापूर' लोकप्रिय शो बनला : 'मिर्झापूर' सीरीजच्या तिसऱ्या सीझनला भारतासह जगभरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. या शोमधील कलाकरांनी जबरदस्त अभिनय करून सर्वांनाच वेड लावलं आहे. प्राइम व्हिडिओवर लॉन्च केलेल्या वीकेंडमध्ये ही वेब सीरीज 180 हून अधिक देशांमध्ये आणि 98% भारतातील पिन कोडमध्ये पाहिली गेली. या कामगिरीवर भाष्य करताना, प्राईम व्हिडिओचे इंडिया ओरिजिनल्सचे प्रमुख निखिल मधोक यांनी म्हटलं , "ही एक हॅट्ट्रिक आहे! अत्यंत लोकप्रिय 'मिर्झापूर' फ्रँचायझीचा तिसरा सीझन प्राइम व्हिडिओ इंडियाच्या लॉन्च वीकेंडला सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनला आहे. सीझन 2 सह मागील सर्व विक्रम मोडणाऱ्या या यशावरून प्रेक्षकांना शोमधील पात्रांशी किती जोडले गेले आहे हे दिसून येते!"
निर्माते झाले खूश : निखिल मधोक यांनी पुढे म्हटलं, "आम्ही हे प्रचंड यश चाहत्यांबरोबर शेअर करायला उत्सुक आहोत, ज्यांनी ही मालिका इतक्या उंचावर नेली आहे. एक्सेल मीडिया ॲन्ड एंटरटेनमेंटबरोबर आमची भागीदारी आणि कलाकार आणि क्रू यांच्या मेहनतीशिवाय हे यश शक्य झाले नसते. चाहत्यांच्या संख्येत झालेली वाढ पाहणे केवळ आनंददायीच नाही तर उत्साहवर्धकही आहे." एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट निर्मित, 'मिर्झापूर सीझन 3'चं दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केलंय. या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, हर्षित शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिक आणि मनु ऋषी चड्ढा यांनी दमदार अभिनय केला आहे. ही वेब सीरीज प्राइम व्हिडिओवर भारतात आणि जगभरातील 240 देशात प्रसारित झाली आहे.