ठाणे : नवीनच लग्न झाल्यानं जावयानं मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याचा बेत आखला होता. तर, जावयानं काश्मीरऐवजी आधी पार्थनेसाठी मक्का-मदिनाला जावे असा सासऱ्यानं जावयाकडं आग्रह धरला. झालं! वादाला तोंड फुटलं. वाद एवढा विकोपाला गेला की सासऱ्यानं आपल्या जावयाला कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागात गाठलं आणि जावयावर अॅसीड हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. सासरा या घटनेनंतर पळून गेला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलीस आरोपी सासऱ्याचा शोध घेत आहेत. इबाद फालके असे अॅसिड हल्लात गंभीर जखमी झालेल्या जावयाचं नाव आहे. तर जकी खोटाल असं फरार झालेल्या सासऱ्याचं नाव आहे.
आधी मक्का-मदिना की काश्मीरला मधुचंद्र यावरून जुंपली: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जकी खोटालच्या मुलीचा महिन्याभरापूर्वीच जखमी इबाद फालकेबरोबर निकाह झाला आहे. निकाहानंतर इबादने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याचं निश्चित केलं होतं. तर, सासरा जकी यांनी इबादला मात्र काश्मीरला मधुचंद्राआधी मुलगी आणि जावयाला मक्का मदिना येथे प्रार्थनेसाठी जावे, असा आग्रह धरला होता. या विषयावरून सासरा आणि जावई यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू होती. इबाद पत्नीसह काश्मीरला जाण्यावर ठाम होते. सासरेबुबांचा विरोधही कायम होता. अनेक दिवस ही धुसफूस सुरू राहिली.
जावयावर फेकलं अॅसिड : गुरुवारी रात्रीच्या सुमारास जावई इबाद कल्याणमधील लाल चौकी भागातून आपल्या घरी पायी जात असताना जकी खोटालने जावयाला रस्त्यावर थांबवून घेतलं. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा मधुचंद्राच्या मुद्द्यावरुन बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या जकीने बरोबर आणलेलं अॅसिड अचानक जावयाच्या अंगावर फेकलं. अचानक घडलेल्या हा प्रकार इबादच्या लक्षातच आला नाही. जावयाला वेदनेत तडफडत ठेवत सासऱ्याने तिथून पलायन केलं. इबादचा चेहरा, शरीराच्या इतर भागावर अॅसिडमुळे जखमा झाल्या आहेत. बाजारपेठ पोलिसांना ही माहिती मिळताच याप्रकरणी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या जकी खोटालचा शोध सुरू केला आहे.
फरार सासऱ्याचा शोध सुरू : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेशसिंग गौड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, "मधुचंद्राला जाण्यावरून जावई, सासरे यांच्यात काही दिवस वाद सुरू होते. जावई काश्मीरला जाण्यावर ठाम होते. तर सासरे खोटाल जावयाने मक्का-मदिनेला जावे, या विषयावर ठाम होते. या वादातून सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केला आणि पसार झाला. आरोपीच्या शोधार्थ पोलीस तपास पथकं विविध भागात गेली आहेत. आम्ही या प्रकरणाचा कसून तपास करत आहोत," असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :