मुंबई : 90च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी 24 वर्षांनंतर मायदेशी परतली आहे. ममतानं मुंबईत परतल्यानंतर आयएएनएसला मुलाखत दिली आहे. ममतानं आता या मुलाखतीत विकी गोस्वामी आणि ड्रग्जप्रकरणी खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिनं म्हटलं, "मी 1996 मध्ये विकी गोस्वामीला भेटले आणि 1997 मध्ये त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर तो 12 वर्षे तुरुंगात राहिला. यादरम्यान त्यांनी मला भेटण्यास सांगितलं होतं, यानंतर मी त्यांना एकदा भेटले. या काळात मी माझे सर्व लक्ष आध्यात्मावर केंद्रित केलं होतं. मी 2012मध्ये कुंभमेळ्यात आंघोळ करायला आले होते. यानंतर विकाही केनियाला गेला होता."
ममता कुलकर्णीनं केला मोठा खुलासा : विकी गोस्वामीबरोबरच्या लग्नाच्या प्रश्नावर ममतानं सांगितलं, "हे सर्व चुकीचं आहे. मी विकीबरोबर लग्न केलेले नाही. मी 12 वर्षे ब्रह्मचारी होते आणि या काळात मी कांदा आणि लसूणही खाल्ले नाही. हे खरे आहे की, मी विकी गोस्वामीबरोबर होते. मी त्याच्यावर नेहमीच प्रेम करेन. मी आध्यात्मावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सर्व काही संपले. मी केनियात विकी गोस्वामीला भेटले होते. यानंतर त्याला ड्रग्जच्या प्रकरणात अमेरिकेत नेण्यात आलं. आता 8 वर्ष झाले आहेत, जवळपास सर्व काही संपलं आहे."
ममता कुलकर्णीवर खोटा आरोप ?: ड्रग केसबद्दल ममतानं म्हटलं, "माझ्याकडे कशाची कमी होती, लोक हे सर्व पैशासाठी करतात. त्यावेळी माझ्याकडे 10 चित्रपटांच्या ऑफर होत्या. माझ्याकडे तीन घरे आणि दोन कार होत्या. तरीही, मी बॉलिवूड सोडले. विकी आणि प्रसिद्धीसाठी माझ्यावर ड्रग्ज प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असे मला वाटते. ज्या अधिकाऱ्यानं माझ्यावर गुन्हा नोंदवला, त्यानं मला फरार असल्याचं घोषित केलं. आता त्याला देखील काही महिन्यांसाठी फरार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. जो जसा करतो, तसाच त्याला मिळते. आज ते आयुक्त कुठे आहेत आणि पोलिसांकडे काहीच पुरावे नाहीत."
ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये करेल कमबॅक ? : ममता कुलकर्णीनं तिच्या बॉलिवूड कमबॅकबद्दल म्हटलं, "आता मी एक साध्वी आहे आणि मला बॉलिवूडमध्ये रस नाही. मी इतर कशाचाही विचार करत नाही. मला आध्यात्मिक जीवन जगायचे आहे, जेणेकरून मी सर्वांना जोडू शकेन." यानंतर भारतात राहणार का ? या प्रश्नावर तिनं म्हटलं, "मी काही महिन्यांसाठी इथे आले आहे. मी वेळोवेळी मायदेशी येत जात राहिल. पुन्हा काही महिन्यानंतर मी मुंबईत असेल.' आता या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा ममता चर्चेत आली आहे.
हेही वाचा :