ठाणे : चार दिवसांपूर्वीच कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीत मराठी विरुद्ध परप्रांतीय शेजाऱ्यांचा वाद राज्यभर गाजला. असं असतानाच डोंबिवलीतील 46 वर्षीय परप्रांतीय नराधमानं शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबातील 9 वर्षाच्या अल्पवीयन मुलीचा विनयभंग करून अश्लील कृत्य केल्याची घटना घडली. या घटनेचा जाब परप्रांतीय आरोपी नवरा बायकोकडे पीडित मुलीच्या आई वडिलांनी विचारला असता त्यांनी मराठी दांपत्याला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तम रामकुमार पांडे आणि त्याची बायको रीना अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.
नेमकं प्रकरण काय? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 9 वर्षीय मुलगी डोंबिवली पूर्वेतील अडवली ढोकडी परिसरात असलेल्या एका सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर आई वडिलांसोबत राहते. तर आरोपी नवरा बायको हे याच सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. शनिवारी (21 डिसेंबर) रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी खेळत असताना आरोपीनं पीडित मुलीला जबरदस्तीनं स्वतःच्या रुममध्ये नेऊन तिचा विनयभंग करून अश्लील कृत्य केलं. या घटनेमुळं पीडित मुलगी घाबरून तिच्यासोबत घडलेला प्रकार तिनं आईला सांगितला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास परप्रांतीय नराधमाला पीडित मराठी कुटुंबानं जाब विचारला असता वाद झाला. या वादातून परप्रांतीय आरोपी नवरा बायकोनं पीडित मुलीच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली.
परप्रांतीय आरोपी नवरा बायकोवर गुन्हा दाखल : मारहाण आणि अल्पवीयन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आज (22 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात परप्रांतीय आरोपी नवरा बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली करकंडे करीत असल्याची माहिती मानपाडा गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे.
हेही वाचा