मुंबई - बुधवार दिवस हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरलाय. कारण या दिवशी गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीची मोठी दुर्घटना घडलीय. नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्यानं प्रवासी बोटीतील आतापर्यंत 13 प्रवासी मृत्युमुखी पडलेत. तर शेकडो प्रवासी यात जखमी झालेत. दरम्यान, जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेनंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा जाहीर केलीय. तर रुग्णांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. आता या दुर्घटनेनंतर प्रकरणातील अनेक बाजू समोर येत आहेत.
...तर कित्येक प्रवाशांचा जीव वाचला असता : बुधवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी ही दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय. तसेच या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असून, मुंबईतून एलिफंटा, मांडवा किंवा अलिबागकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. "प्रवासी बोटीवर जे बोटीचे मालक किंवा बोटीवर जे कर्मचारी आणि कॅप्टन असतात, त्यांच्याकडून वारंवार सुरक्षेबाबत प्रवाशांना सूचना करण्यात येतात. मात्र प्रवासी याकडे सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष करतात. प्रवासी दुर्लक्ष करीत असल्याचे अनेकदा आमच्या निदर्शनास आले असून, नीलकमल बोटीमध्येसुद्धा काहींनी लाईफ जॅकेट घातले नसल्याचं नीलकमल या बोटीपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या 'अल मरियम' या बोटीवरील कॅप्टन सुभाष मोरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं. जर त्यांनी लाईफ जॅकेट घातले असते तर कित्येक प्रवाशांचे जीव वाचले असते, असंही सुभाष मोरेंनी अधोरेखित केलंय.
हमारा कपडा गंदा होता है... : बुधवारी घडलेल्या प्रवासी बोटीच्या दुर्घटनेनंतर गुरुवारपासून प्रवासी बोटीतील प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट दिले जाते. तसेच लाईफ जॅकेट आणि अन्य सुरक्षेच्या बाबतीत बारकाईने लक्ष दिले जाते. दरम्यान, आमच्या बोटीवर जे प्रवास येतात. त्यांना जर आम्ही लाईफ जॅकेट घालण्यास दिले तर प्रवाशांकडून लाईफ जॅकेट घालण्यास थेट नकार दिला जातो. "हमारा नया कपडा है...., यह गंदा हो जायेगा...," असं प्रवाशाकडून सांगण्यात येतंय. जरी नवीन जॅकेट दिले तरी प्रवासी लाईफ जॅकेट घालत नाहीत. लाईफ जॅकेट घालण्यास नकार देत असल्याची धक्कादायक माहिती 'अल मरियम' या बोटीवरील कॅप्टन सुभाष मोरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय. त्यामुळं आता जर तुम्ही बोटीतून प्रवास करत असाल तर लाईफ जॅकेट नक्की घाला, अशी कोणतीही दुर्घटना घडली तर त्यातून आपला जीव नक्की वाचू शकेल, असं आवाहनही कॅप्टन सुभाष मोरे यांनी केलंय.
हेही वाचा-