मुंबई - The Raja Saab First look : पॅन इंडिया सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'द राजा साब' या चित्रपटातील त्याची पहिली झलक आज, २९ जुलै रोजी चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित केली आहे. मारुती दिग्दर्शित हा हॉरर रोमँटिक कॉमेडी चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'द राजा साब'च्या 45 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभासच्या मुख्य भूमिकेची झलक दाखवण्यात आली आहे. क्लिपमध्ये प्रभास मोटारसायकलवर सूट, सनग्लासेस आणि हातात फुलांचा गुच्छ घालून येताना दिसत आहे. चित्रपटाच्या पहिल्या झलकवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'द राजा साब'
पीपल मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे संगीत एसएस थमन यांनी दिले आहे. 'द राजा साब'मध्ये प्रभास, मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. वरलक्ष्मी सरथकुमार, जिशू सेनगुप्ता आणि ब्रह्मानंदम यांचाही समावेश आहे. हा मास एंटरटेनर चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. प्रभास सध्या त्याच्या आलीकडे रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'द राजा साब' ची रिलीज तारीख
प्रभासचा 'द राजा साब' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक हॉरर रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे यामध्ये प्रभास एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय मालविक मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार हे कलाकार विशेष भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही या चित्रपटात दिसणार आहे.