मुंबई - कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित 'भूल भुलैया 3' चा ट्रेलर बुधवारी जयपूरमधील राज मंदिरात लाँच करण्यात आला. ट्रेलरने २४ तासांत इतिहास रचला असून, सर्वाधिक पाहिलेला हिंदी ट्रेलर बनला आहे. कार्तिकने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं लिहिले आहे की, 'भूल भुलैया 3' च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा सर्वात जास्त पाहिला जाणारा हिंदी ट्रेलर ठरला आहे.
'सिंघम अगेन'लाही टाकलं मागं
'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन मोठे चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये भिडणार आहे. दोघांचे ट्रेलरही जवळपास रिलीज झाले आहेत. पहिल्यांदा 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज झाला जो प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याला २४ तासांत १३८ व्ह्यूज मिळाले. बुधवारी, कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया'चा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला 24 तासांत 155 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे 'भूल भुलैया 3' ने 'सिंघम अगेन'लाही व्ह्यूजच्या बाबतीत मागं टाकलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले, ''इतके प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, हे दिवाळी एक चक्रव्यूह आहे.'' पोस्टरवर लिहिले आहे - ''ऐतिहासिक, 'भूल भुलैया 3' ने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, 24 तासांत 155 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेला हा पहिला हिंदी ट्रेलर ठरला आहे.''
माधुरी-विद्याच्या नृत्यानं वेधलं प्रेक्षकांचे लक्ष
'भूल भुलैया 3' च्या 3.50 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कोणत्या दृश्यानं सर्वाधिक लक्ष वेधलं असेल तर ते विद्या आणि माधुरीच्या नृत्याचं आहे. ट्रेलरमध्ये डान्सची फक्त एक छोटीशी झलक दाखवण्यात आली असली तरी प्रेक्षकांना ती खूप आवडली आहे. एकाने लिहिले, ''विद्या आणि माधुरीच्या डान्सचे काय'', मी फक्त यासाठीच उत्साहित आहे. एकाने लिहिले - ''अरे देवा, एक नाही तर दोन मंजुलिका.'' आणखी एकानं कमेंट केली- ''हा पूर्णपणे विद्या आणि माधुरीचा चित्रपट आहे.''
बॉक्स ऑफिसवर दोन जबरदस्त चित्रपटांची होणार टक्कर
1 नोव्हेंबरला 'भूल भुलैया 3'ची टक्कर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'बरोबर होणार आहे. सिंघम अगेनमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ यांसारख्या उत्कृष्ट मल्टीस्टारर कलाकार आहेत. तर भूल भुलैया ३ मध्ये कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन, तृप्ती डिमरी, विजय राज हे कलाकार विशेष भूमिका साकारत आहेत. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.