चेन्नई : तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल' (Pushpa 2) हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता. या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले आहेत . 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून अनेक चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे फलक लटकलेले दिसले. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'पुष्पा 2' हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
आपल्या लाडक्या अभिनेत्याचा चित्रपट बघण्यासाठी चाहते चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी करताय. असं असतानाच आता चक्क नाईट ड्युटी सोडून एसीपी चित्रपट बघायला गेल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून 'पुष्पा 2'नं पोलिसांनाही चांगलीच भुरळ घातल्याचं बघायला मिळतंय.
नेमकं काय आहे प्रकरण? : तिरुनेलवेली (तामिळनाडू) येथे 7 डिसेंबरला रात्रीच्या गस्तीदरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) सेंथिल कुमार हे आपल्या कर्तव्याचं उल्लंघन करत 'पुष्पा 2' चित्रपट बघत होते. डीआयजी आणि शहर पोलीस आयुक्त (प्रभारी) मूर्ती यांच्या देखरेखीखाली लेडी इन्स्पेक्टर नेल्लई शहराच्या विविध भागात गस्त घालत असताना त्यांनी सेंथिल कुमार हे चित्रपट पाहताना आढळून आले. त्यांनी ही माहिती तत्काळ नेल्लई पोलीस आयुक्त मूर्ती यांना दिली. त्यानंतर मूर्ती यांनी माईकवर सेंथिल कुमारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 15 मिनिटांपर्यंत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं नियंत्रण कक्षानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अखेर सेंथिल कुमारनं प्रतिसाद दिला. आपण थचनाल्लूर परिसरात असल्याचा खोटा दावा केला.
जाहीरपणं फटकारले : यानंतर, परिस्थितीची आधीच जाणीव असलेल्या मूर्ती यांनी ओपन माइकवरच सेंथिल कुमारला त्यांच्या बेजबाबदार कृतीबद्दल जाहीरपणे फटकारलं. ते म्हणाले, "सर्व महिला निरीक्षक गस्तीवर असताना तुम्ही रात्रीच्या ड्युटीदरम्यान चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहताय, ही जबाबदारीची वागणूक आहे का?", असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा -