नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)ची भारताच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीसुद्धा ती संघटना कटिबद्ध आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)नं आता नियमांमध्येही काही बदल केलेत. त्यानुसार तुम्ही कर्मचारी असाल तर दर महिन्याला तुमच्या पगाराची ठराविक रक्कम EPFO मध्ये जमा करणे आवश्यक असते. EPFO मध्ये जमा केलेली रक्कम निवृत्तीनंतर परिपक्व होते, विशेष म्हणजे गरजेच्या वेळी ती रक्कम आपल्याला खात्यातून काढताही येते. एवढेच नाही तर ईपीएफओ आपल्या सदस्यांना गरजेच्या वेळी ईपीएफ फंडातून पैसे काढण्याची सुविधा देते. आंशिक पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलीय. जर तुम्ही तुमच्या EPF खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर EPFO च्या पैसे काढण्याच्या नियमांमध्ये अलीकडील केलेल्या बदलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
EPFO मधून पैसे काढण्याचे नवे नियम काय?
- EPF मधून आंशिक पैसे काढण्यासाठी EPF सदस्याला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. केवळ शिक्षण, घर खरेदी किंवा बांधकाम, लग्न आणि उपचार यासाठी पैसे काढता येतात.
- EPFO च्या पैसे काढण्याच्या नियमांनुसार, EPF धारक निवृत्तीच्या एक वर्ष आधी 90 टक्के रक्कम काढू शकतो. 90 टक्के काढण्यासाठी सदस्याचे वय 54 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- आजच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये टाळेबंदी होत आहे. अशा परिस्थितीत ईपीएफओच्या नियमांनुसार, जर कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि कर्मचारी निवृत्तीपूर्वी बेरोजगार झाला तर तो ईपीएफ फंडातून पैसे काढू शकतो.
- कर्मचारी एका महिन्याच्या बेरोजगारीनंतर 75 टक्के पैसे काढू शकतो आणि जर तो सलग 2 महिने बेरोजगार राहिला तर पूर्ण पैसे काढू शकतो. नवीन नोकरी मिळाल्यानंतर कर्मचारी उर्वरित 25 टक्के निधी नवीन EPF खात्यात हस्तांतरित करू शकतो.
- जर एखाद्या कर्मचाऱ्याने EPF मध्ये सलग 5 वर्षे योगदान दिले तर त्याला पैसे काढण्याच्या वेळीदेखील कर लाभ मिळतो. मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास टीडीएस कापला जातो. 50 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे काढल्यास टीडीएस कापला जात नाही.
- जर सदस्याने पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड सादर केले असेल तर 10 टक्के टीडीएस कापला जातो. पॅन कार्ड सादर न केल्यास 30 टक्के कपात केली जाते.
आंशिक पैसे काढण्यासाठी अर्ज कुठे करावा?: आंशिक पैसे काढण्यासाठी ईपीएफ सदस्याला ईपीएफ पोर्टल आणि उमंग ॲपवर अर्ज करावा लागेल. नियोक्त्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर पैसे सदस्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. आंशिक पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर सदस्य स्थितीदेखील तपासू शकतो.
पैसे काढण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया: EPF मधून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी तुमचा सक्रिय असलेला UAN हा तुमच्या KYC (आधार, पॅन आणि बँक खात्याशी) जोडलेला असला पाहिजे. तसेच तुम्ही ही अट पूर्ण केल्यास तुमच्या EPF खात्यातून पैसे काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करू शकता.
टप्पा 1 - तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून UAN सदस्य पोर्टलवर लॉग इन करा
टप्पा 2 - वरच्या मेनू बारमधून ‘ऑनलाइन सेवा’ टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊन मेनूमधून ‘दावा (फॉर्म-31, 19 आणि 10C)’ निवडा.
टप्पा 3 - तुमची माहिती स्क्रीनवर दाखवली जाईल. तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक एंटर करा आणि 'Verify' वर क्लिक करा.
टप्पा 4 - अंडरटेकिंग सर्टिफिकेट स्वाक्षरी करण्यासाठी 'होय' वर क्लिक करा आणि पुढे जा
टप्पा 5 – आता ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ पर्यायावर क्लिक करा
टप्पा 6 - तुमचा निधी ऑनलाइन काढण्यासाठी 'पीएफ ॲडव्हान्स (फॉर्म 31)' निवडा
टप्पा 7 – फॉर्मचं एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक रक्कम आणि कर्मचाऱ्याचा पत्ता निवडावा लागेल. ज्या सर्व उद्देशांसाठी कर्मचारी पैसे काढू शकत नाहीत ते लाल रंगात नमूद केले जातील.
टप्पा 8 - पडताळणी (verification) टिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा
टप्पा 9 - तुम्ही ज्या उद्देशासाठी फॉर्म भरला आहे, त्यानुसार, तुम्हाला स्कॅन केलेले दस्तऐवज सबमिट करावे लागतील
टप्पा 10 - तुमच्या कंपनीला तुमची पैसे काढण्याची विनंती स्वीकारावी लागेल, ज्यानंतर पैसे तुमच्या EPF खात्यातून काढले जातील आणि ते तुम्ही फॉर्ममध्ये भरलेल्या बँक खात्याच्या तपशिलांमध्ये ते जमा केले जातील. ईपीएफओमध्ये नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवर एक एसएमएस येईल. दाव्यावर प्रक्रिया झाल्यानंतर रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. EPFO द्वारे प्रदान केलेली कोणतीही औपचारिक अंतिम मुदत नसली तरी पैसे सहसा 15-20 दिवसांच्या आत जमा होतात.
हे वाचलंत का :