कपूरथला : रशिया आणि युक्रेनमधील 9 महिन्यांच्या युद्धानंतर भारतीय तरुण राकेश यादव हा अखेर मायदेशी परतलाय. भारतात परतल्यानंतर त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्यसभा सदस्य संत बलबीर सिंग सीचेवाल यांच्या प्रयत्नांमुळं हा तरुण भारतात आला. राकेश हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात त्याचा एक सहकारी मारला गेला. ड्रोन पाहताच राकेशनं तेथे बांधलेल्या बंकरमध्ये उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचला.
गार्ड व्हेंसीच्या नावाखाली एजंटकडून फसवणूक : रशियाहून परतलेल्या राकेश यादवने माध्यमांशी बोलताना सांगितलं, "मला आणि माझ्यासह इतर 5 सहकाऱ्यांना 8 महिन्यांपूर्वी एजंटनं सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी बोलावलं होतं. एजंटनं 2 लाख पगार असल्याचं सांगितल्यानं परदेशात गेल्यास घरची परिस्थिती सुधारेल असं वाटलं. परंतु, तिथं पोहोचताच मला जबरदस्तीनं रशियन सैन्यात भरती करण्यात आलं आणि रशियन भाषेतील कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं. स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यावर त्यांनी मारहाण केली."
आत्महत्येचा प्रयत्न : पुढं राकेश म्हणाला, "युद्धामुळं तेथील परिस्थिती खूपच वाईट होती. शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी आम्हाला युक्रेनमध्ये वाहनात बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे भरण्यास सांगितलं. एकानं काम केलं नाही तर त्यांनी मारहाण केली. त्यानंतर आम्हाला युद्धक्षेत्रात पाठवण्यात आलं आणि सांगितलं की, आम्ही वाचलो तर भारतात जाऊ, नाहीतर आम्ही इथंच राहू. आम्हाला लढण्यासाठी शस्त्रं देण्यात आली."
"युद्धादरम्यान क्षेपणास्त्र कुठून येत आहे, कोणाला गोळी मारावी की नाही हे कळत नव्हतं. आम्ही चुकून रशियनवर गोळीबार केल्यानंतर आमची शस्त्रं आमच्याकडून काढून घेण्यात आली. परिस्थिती खूपच वाईट होती. मी 2-3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्याशिवाय 20-25 भारतीय तरुणही तिथं अडकले आहेत, ज्यांनी भारत सरकारकडं मदत मागितली आहे."
दलालांवर कडक कारवाईची मागणी : फसवणूक करणाऱ्या एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी राकेशनं केली आहे. त्यानं सांगितलं की, "माझे दोन सहकारी सुनील आणि श्याम सुंदर यांचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचं पार्थिव आत्ता भारतात आलय. तेथील सरकार नुकसान भरपाई देते की नाही माहीत नाही. तिथल्या एजंटनं आमचं बँक खातं उघडलं आणि सर्व कागदपत्र तो त्याच्यासोबत घेऊन गेला. एजंटला आम्हा सर्वांचा कोड नंबर माहीत होता. आमच्या पासपोर्टची प्रतही त्याच्याकडं होती. त्यामुळं जेव्हा जेव्हा पैसे यायचे तेव्हा तो एजंट काढून घेत असे."
9 महिने मी खूप वाईट जीवन जगलो. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. जे लोक दिशाभूल करून मुलांना युक्रेनमध्ये पाठवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
- राकेश यादव
हेही वाचा -
- युक्रेन रशिया संघर्षात पाश्चात्यांच्या अति हस्तक्षेपानंतर पुतीन आक्रमक, अण्वस्त्र वापराच्या पर्यायावर सूचक तयारी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेन्स्कींची गळाभेट; तुमचा मोठा प्रभाव आहे, रशिया युद्धात मधस्थी केल्यास आनंदच; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास - PM Modi Meets Zelenskyy
- रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका जागतिक परिप्रेक्षात महत्वाचीच नाही तर आणखी काय... - Russia Ukraine war