कन्याकुमारी PM Modi Meditate In Kanyakumari : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (30 मे) संध्याकाळी तमिळनाडूमधील कन्याकुमारी इथं दाखल झाले. पंतप्रधान मोदी हे कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकावर सुमारे 45 तासांचं मौनव्रत धारण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलीय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील प्रचार संपवून पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून तिरुअनंतपुरम इथं दाखल झाले, त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं कन्याकुमारी इथं पोहोचले.
विवेकानंद शिलास्मारकला जाण्यापूर्वी त्यांनी येथील भगवती अम्मन मंदिरात पूजन केलं. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर विशेष बोटीनं ते विवेकानंद शिलास्मारकावर पोहोचले. इथं पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते ध्यानाला बसले. स्वामी विवेकानंद ज्या ठिकाणी ध्यानाला बसले होते, त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सुमारे दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. 1 जूनला त्यांचं मौनव्रत पूर्ण होणार असून त्यानंतर ते राजधानी दिल्लीला रवाना होतील.
1 जूनला दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी स्मारकाशेजारी असलेल्या तिरुवल्लुवर पुतळ्याला भेट देण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध, मध्य समुद्रातील स्मारकात पंतप्रधान मोदींच्या 45 तासांच्या ध्यानधारणेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
चेन्नईच्या विविध भागात 'मोदी गो बॅक'च्या पोस्टर्ससह निदर्शनं : पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याच्या विरोधात चेन्नईतील विविध भागात 'मोदी गो बॅक' अशा घोषणा असलेले पोस्टर लावून निदर्शनं करण्यात आली. द्रमुकचे वकील हेमंत अन्नादुराई यांनी 'मोदी गो बॅक'चे पोस्टर बनवून चेन्नईतील ट्रिपलिकेन, पूकादई आणि पॅरिस कॉर्नरसारख्या महत्त्वाच्या भागात ते चिकटवून पंतप्रधान मोदींचा निषेध केला. ही पोस्टर्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिरुनेलवेली जिल्हा काँग्रेसकडूनही पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचा निषेध करण्यात आलाय. नेल्लई कोक्राकुलम येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष शंकर पांडियन यांच्या नेतृत्वाखाली 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. मात्र, निदर्शनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून निदर्शन थांबवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा -
- 'मला मृत्यूचा व्यापारी, घाणेरड्या नाल्यातला किडा...; पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले! - Lok Sabha Election 2024
- पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलीचं फलित काय? महायुतीला फायदा होणार? राजकीय वर्तुळात विविध चर्चा - lok sabha election
- मोदी यांना 'दंश करणारा साप' म्हणत संजय राऊतांचा 'जहरी' हल्लाबोल; राजकीय वातावरण तापणार? - Sanjay Raut