मुंबई Manohar Joshi Passed Away : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष तसंच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीय. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलंय.
मनोहर जोशींसोबतचा फोटो शेअर करत मोदींकडून शोक व्यक्त : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनावर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत शोक व्यक्त केलाय. त्यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मनोहर जोशी यांच्या निधनानं दुःख झालं. ते एक दिग्गज नेते होते. ज्यांनी सार्वजनिक सेवेत वर्षे घालवली. महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशीजी यांना चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती संवेदना. ओम शांती."
विशिष्ट आणि निष्पक्ष शैलीमुळं त्यांना सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर : माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत मनोहर जोशांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "माजी लोकसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी श्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. लोकशाही मूल्ये समृद्ध करत त्यांनी उत्कृष्ट संसदीय परंपरा प्रस्थापित केल्या. सभागृह चालवण्याच्या त्यांच्या विशिष्ट आणि निष्पक्ष शैलीमुळं त्यांना सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर होता. त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यानं मला सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी मार्गदर्शन मिळालं. त्यांचं निधन माझंही वैयक्तिक नुकसान आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. या अतीव दु:खाच्या प्रसंगी, माझ्या शोकसंवेदना शोकाकुल परिवारासोबत आहेत."
महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला : शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे. नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. 'महाराष्ट्र भूषण' या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी."
संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन प्रमुख भुमिका : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनावर जेष्ठ नेते शरद पवार यांनीही शोक व्यक्त केलाय. त्यांनी X वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीनं काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष पदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली...!"
संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून ओळख : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत शोक व्यक्त केलाय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती."
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही X वर पोस्ट करत दुखः व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलाय. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झालीय. जोशी सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
हेही वाचा :