चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईतील मरीना बीचवर भारतीय हवाई दलाच्या (IAF) एअर शोदरम्यान धक्कादायक घटना घडली. एअर शो पाहण्यासाठी आलेल्या प्रचंड गर्दीमुळं गुदमरून हृदयविकाराच्या झटक्यानं चौघांचा मृत्यू झाला. पाणी, वैद्यकीय मदत या मुलभूत सुविधांअभावी अनेक लोक कडाक्याच्या उन्हात अडकून पडले. त्यामुळं 200 हून अधिक लोक डिहायड्रेशनमुळं बेशुद्ध झाले.
चार जणांचा गुदमरून मृत्यू : अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जॉन (वय 56), कार्तिकेयन, श्रीनिवासन आणि दिनेश कुमार अशी मृतांची नावं आहेत. गुदमरल्याच्या तक्रारीनंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर एअर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी आणि गोंधळासाठी प्रेक्षकांनी खराब नियोजनाला जबाबदार धरलं. एअर शोमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना सामील करून घेण्यासाठी आणखी व्यवस्था करायला हवी होती, असं ते म्हणालेत.
#WATCH | Chennai, Tamil Nadu | A woman seen being evacuated from a huge rush at the Mega Air Show on Marina Beach ahead of the 92nd Indian Air Force Day.
— ANI (@ANI) October 6, 2024
There are reports of attendees fainting, rushed to the hospital due to heavy crowd presence and heat. pic.twitter.com/SgNEhuTnUH
एअर शो पाहण्यासाठी 15 लाखांहून अधिक लोक जमले : एअर शो पाहण्यासाठी 15 लाखांहून अधिक लोक जमले होते. त्यामुळं रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. वाहतुकीवर ताण निर्माण झाला होता. केवळ शहरातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं प्रेक्षक आल्यानं समस्या अधिकच बिकट झाली. अनेकांना मेट्रो आणि रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागला. वेळेवर मदत देण्यासाठी रुग्णवाहिकांना गर्दीच्या रस्त्यावरून नेव्हिगेट करण्यासाठी संघर्ष करावा लागला. चेन्नई पोलिसांनी प्रयत्न करूनही आपत्कालीन सेवा गर्दीच्या गरजा पूर्ण करू शकल्या नाहीत.
AIADMK नं राज्य सरकारचा निषेध केला : AIADMK नेते आणि माजी मुख्यमंत्री इ.के. पलानीस्वामी यांनी भारतीय हवाई दलाच्या एअर शोदरम्यान झालेल्या गोंधळावरुन राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत. "कार्यक्रमातील प्रशासकीय बंदोबस्त आणि गर्दीचं योग्य व्यवस्थापन झालं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही अपुरा पडला. त्यामुळं लोकांची तारांबळ उडाली. लोकांना पिण्याचं पाणीही उपलब्ध नव्हतं", असंही ते म्हणालेत. तर विरोधी पक्षाच्या नेत्यानं या घटनेवर शोक व्यक्त केलाय. तसंच डीएमके सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, "इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमातही राज्य सरकार योग्य प्रकारे समन्वय साधण्यात अपयशी ठरलंय."
हेही वाचा -