जयपूर Heavy Rains Lash Parts Of Rajasthan : मुसळधार पावसानं राजस्थानमध्ये हाहाकार उडवला असून विविध घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल 19 नागरिकांचा बळी गेला आहे. यात घर कोसळल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यासह कनोटा धरणात बुडून रविवारी 5 तरुणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सहायक पोलीस आयुक्त मुकेश चौधरी यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधीला सांगितलं की, "कनोटा धरणावर सहा तरुण पिकनिकसाठी आल्यानंतर आंघोळीसाठी ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं अखेर पाच जण बुडाले गेले. त्यापैकी एका तरुणाला बचावण्यात आलं आहे."
कनोटा धरणात पाच तरुण गेले वाहून : कनोटा धरणात पाच तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली. प्रशासनानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि नागरी संरक्षण दलांनी शोध मोहीम सुरू केली. अथक शोधमोहिमेनंतर या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश जवानांना यश आलं. हर्षा नागोरा (20), विनय मीना (22), विवेक माहोर (22), अजय माहोर (22) आणि हरकेश मीना (24) अशी मृतांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेतील मृत तरुणांपैकी तिघं शास्त्रीनगर इथले रहिवासी असून एक दादी का फाटक तर दुसरा नई की थडी इथला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकाच कुटुंबातील सात तरुणांचा बुडून मृत्यू : एकाच कुटुंबातील सात जण नदीत आंघोळ करताना बुडाल्याची घटना भरतपूर इथं घडल्यानं मोठी खळबळ उडाली. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, श्रीनगर गावातील आठ जण भरतपूर इथल्या बाणगंगा नदीत स्नान करत होते. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं ते खोल पाण्यात गेले. त्यानंतर एकापोठोपाठ एक करत बुडाले. यात पवनसिंग जाटव (20), सौरभ जाटव (18), गौरव जाटव (16), भूपेंद्र जाटव (18), शंतनू जाटव (18), लक्की जाटव (20) आणि पवन जाटव (22) अशी मृतांची नावं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुसळधार पावसाचा फटका, आज चार जिल्ह्यांतील शाळा बंद : राजस्थानात पावसानं हाहाकार उडवल्यानं मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चार बाधित जिल्ह्यांतील सर्व शाळा सोमवारी बंद ठेवण्याचे निर्देश दिले. रविवारी मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अधिकाऱ्यांना बाधित भागात मदतकार्य जलद करण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याला गती देण्यासाठी संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांची स्थापना करण्यात यावी. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या इशाऱ्यानुसार उपाययोजना करण्यास सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानातील सवाई माधोपूर, करौली, भरतपूर आणि दौसा जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मुसळधार पावसामुळे कोसळला घराचा ढिगारा : मुसळदार पावसामुळे मेहराणा गावात तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. हे नागरिक सनवलोद गावचे रहिवासी होते. या घटनेत अनुज मेघवाल (22), बुल्केश (21) आणि अनुज कुमार (20) यांचा मृत्यू झाला. तर करौली या गावात रविवारी मुसळधार पावसामुळे घराच्या ढिगाऱ्याखाली अडकून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. झाकीर खान (40) आणि झिया खान (12) अशी घराचा ढिगारा अंगावर कोसळून मृत्यू झालेल्या पिता पुत्राची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना घडली, तेव्हा हे दोघंही जण आपल्या करौली गावातील डोलीखार मोहल्ला इथल्या घरात झोपले होते. करौली जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ रामकेश मीना यांनी प्रसार माध्यमांना याबाबत सांगितलं की, "घराचा ढिगारा कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर बांसवाडा इथल्या केडिया नाल्यात पाय घसरून विकास शर्मा या 19 वर्षीय नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. विकास शर्माचा मृतदेह एसडीआरएफच्या पथकानं शोधल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यासह सवाई माधोपूरमध्ये तलावात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पाचना धरणातून सोडण्यात आलं 8 हजार क्युसेक पाणी : आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, "हिंदुआन आणि करौलीमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. या परिसरात शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 15 इंच पावसाची नोंद झाली आहे." जिल्ह्यातील पाचना धरणातून सुमारे 8 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं करौलीतील अधिकाऱ्यांनी नागरिकांना नद्यांजवळील भागात जाण्यापासून टाळावं, असं आवाहन केलं आहे. पार्वती, गंभीर आणि बाणगंगा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. नागरिकांच्या बचावासाठी नागरी संरक्षण दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची ( SDRF ) टीम तैनात करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
आणीबाणी असल्यास यांना करा संपर्क :
मुसळधार पावसात तुमचे नातेवाईक अडकले असल्यास तुम्ही या क्रमांकांवर फोन करुन प्रशासनाची मदत घेऊ शकता :
- जयपूर जिल्हाधिकारी कार्यालय : 0141-2204475, 0141-2204476 आणि पोलीस नियंत्रण - 100, 112.
- जयपूर महानगरपालिका घाटगेट पूर नियंत्रण कक्ष : 8279179063
- आमेर पूर नियंत्रण कक्ष : 8279179060
- VKI पूर नियंत्रण कक्ष: 8764880070
- मालवीय नगर पूर नियंत्रण कक्ष : 8764880030
- मानसरोवर पूर नियंत्रण कक्ष : 8764880060