नवी दिल्ली Shetkari Andolan : शंभू सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. हरियाणा पोलिसांनी बुधवारी शंभू तसंच खनौरी सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. MSP देशात लागू करावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. काही शेतकऱ्यांनी हरियाणातील अंबालाजवळील शंभू येथे उभारलेल्या नाकेबंदीकडं जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.
शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या : शंभू सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी ड्रोनही दिसत आहेत. पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी येथे पोलिसांनी सुरक्षा व्यावस्था कडक ठेवली आहे. तरीदेखील शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांना शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. सैरावैरा पळताना काही शेतकरी जखमी झाल्याची देखील माहिती आहे.
आंदोलकांच्या हल्ल्यात 12 पोलीस जखमी : याबाबत हरियाणा पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे. दाता सिंह-खनौरी सीमेवर आंदोलकांनी मिरचीची पूड फेकून पोलिसांना चारही बाजूंनं घेरल्याचा दावा केला आहे. यानंतर आंदोलकांनी दगडफेकीसोबतच पोलिसांवर लाठ्या-काठ्यानं हल्ला केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेत सुमारे 12 पोलीस गंभीर जखमी झाल्याचा हरियाणा पोलिसांचा दावा आहे. तसंच हरियाणा पोलिसांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलंय.
एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा : या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी संघटनेनं केलाय. याबाबत शेतकरी नेते काका सिंह कोटरा यांनी सांगितलं की, "चरणजीत सिंह यांचा 23 वर्षीय मुलगा शुभकरन सिंगचा संगरूरच्या खनौरी सीमेवर मृत्यू झालाय. त्याचा मृतदेह सध्या पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात ठेवण्यात आला आहे." याबाबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनीही ट्विट केलं आहे.
शेतकऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी केला इन्कार : हरियाणा पोलिसांनी खनौरी सीमेवर शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची अफवा असल्याचं म्हटलं आहे. दोन पोलीस कर्मचारी तसंच एक आंदोलक जखमी झाल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं. जिंदचे पोलीस अधीक्षक सुमित कुमार म्हणाले की, सध्या एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झालेला नाहीय. एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का :