मुंबई ED Raids on Hiranandani Group : अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) आज मुंबईतील हिरानंदानी ग्रूपच्या मुख्य कार्यालये आणि इतर ठिकाणांवर छापेमारी केलीय. फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) शी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय एजन्सीनं ही कारवाई केली. निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांनी 1978 मध्ये हिरानंदानी ग्रुपची स्थापना केली. ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे. हा व्यवसाय समूह भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक आहे. हिरानंदानी समूहाचे मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद इथं अनेक रिअल इस्टेट प्रकल्प आहेत.
महुआ मोईत्रा यांच्या 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात हिरानंदानी ग्रूप चर्चेत : टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणातही हिरानंदानी ग्रूपही चर्चेत होता. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं लेखी तक्रारीत महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या वतीनं संसदेत प्रश्न विचारण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता. एथिक्स कमिटीच्या तपासात असं समोर आलंय की, महुआ मोईत्रा यांनी आपला संसदीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड दर्शन हिरानंदानीसोबत शेअर केला होता. विधिमंडळ कामकाजाच्या गोपनीयतेचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दर्शन हिरानंदानी यांनीही न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन महुआ मोइत्रा यांना गिफ्ट दिल्याचं आणि तिच्या संसदीय पोर्टलवर प्रश्न अपलोड केल्याचं मान्य केलं होतं. दर्शन हिरानंदानी हे निरंजन हिरानंदानी यांचे पुत्र असून सध्या हिरानंदानी ग्रूपचे सीईओ आहेत.
मार्च 2022 मध्ये आयकर विभागाची छापेमारी : हिरानंदानी समूहाच्या प्रकल्पांमध्ये निवासी इमारती, कार्यालयीन इमारती, रुग्णालये, शाळा, उद्यानं, समुदाय केंद्रे, स्पोर्ट्स क्लब, बँका, शॉपिंग मॉल, फिल्म स्टुडिओ, बस गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि स्विमिंग पूल यांचा समावेश आहे. मुंबईत 250 एकरमध्ये पसरलेल्या या टाऊनशिपमध्ये 42 निवासी इमारती आणि 23 व्यावसायिक इमारती आहेत. डेटा सेंटर व्यवसायाच्या क्षेत्रातही हा गट आघाडीवर आहे. अलीकडेच हिरानंदानी ग्रूपनं नोएडा इथं दोन डेटा सेंटर्सची स्थापना केलीय. मार्च 2022 मध्ये आयकर विभागानं मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये पसरलेल्या हिरानंदानी ग्रूपच्या सुमारे 25 ठिकाणांची झडती घेतली होती.
हेही वाचा :