नवी दिल्ली : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक नेत्याला राज्यसभेवर उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस हायकमांडवर दबाव येत आहे. पक्षाच्या अंतर्गत वादामुळं 2022 मध्ये राज्यसभा निवडणूक उमेदवार म्हणून काँग्रेसनं उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली होती. त्यामुळं काँग्रेस पक्षाचे आमदार नाराज झाले होते.
अशोक चव्हाणांना मिळणार राज्यसभेची उमेदवारी : यावेळी मात्र काँग्रेस पक्षाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कारण अलीकडच्या काळात काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. यापैकी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, ज्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
9 राज्यसभेच्या जागांसाठी चर्चा : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी 12 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात काँग्रेस पक्ष जिंकू शकणाऱ्या 9 राज्यसभेच्या जागांसाठीच्या नावांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत भाग घेतला होता. यावेळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची उपस्थित होती.
क्रॉस व्होट होण्याची शक्यता : सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी तसंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळं 27 फेब्रुवारीच्या राज्यसभा निवडणुकीपूर्वीच त्यांच्या जवळचे काही काँग्रेस आमदार देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते क्रॉस व्होट करू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काही आमदार नाराज : “2022 मध्ये, महाराष्ट्राच्या आमदारांना राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी स्थानिक चेहरा हवा होता, पण हायकमांडनं बाहेरच्या व्यक्तीची निवड केल्यानं काही आमदार नाराज होते. राजस्थान, हरियाणामध्येही हीच स्थिती होती. एखाद्या राज्यातून राज्यसभेवर कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्ष नेतृत्वाचा विशेषाधिकार आहे,” असं एआयसीसीच्या (AICC) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय.
राज्यात काँग्रेस मजबूत : याबाबत काँग्रेसनं म्हटंल की, “आमचे सर्व आमदार काँग्रेससोबत आहेत. राज्यात काँग्रेस मजबूत आहे, असं एआयसीसीचे महाराष्ट्राचे प्रभारी सचिव आशिष दुआ यांनी सांगितलं. काँग्रेसकडं 45 आमदार होते. नंतर सुनील केदार यांना दोषी ठरल्यामुळं त्यांचं सदस्यत्व काढून घेण्यात आलं आहे. तसंच अलीकडंच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळं काँग्रेसच्या आमदारांची संख्या 43 वर पोहोचली आहे.
काँग्रेसची 14 तसंच 15 फेब्रुवारीला बैठक : काँग्रेस हायकमांडनं राज्य नेतृत्वाला 14 फेब्रुवारी तसंच 15 फेब्रुवारी रोजी सीएलपीची बैठक बोलावण्यास सांगितलं आहे. राज्यसभा निवडणुकीव्यतिरिक्त, तीन वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा परिणाम यासह आणखी काही आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. “15 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या नामांकनापूर्वी आमदारांची ही नियमित बैठक आहे. त्यामुळं व्यावहारिकदृष्ट्या ही दोन दिवसांची बैठक असेल. सर्व आमदार एकत्र आहेत,” असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईटीव्ही भारतला सांगितलंय.
हे वाचलंत का :
- 'अन्नदाता' पुन्हा रस्त्यावर; सरकार बरोबरची चर्चा निष्फळ, नाकाबंदी करत प्रशासनानं ठोकले रस्त्यावर खिळे
- "मुंबई काँग्रेस अध्यक्ष आशिष शेलार", भाजपात प्रवेश करताच अशोक चव्हाणांचा 'स्लिप ऑफ टंग'; म्हणाले फडणवीस जे सांगतील ते करणार
- 18 वर्षीय अथर्व ताकपिरेने 18 हजार रुपयांत केली आठ राज्यात भ्रमंती; घरच्यांचा विश्वास जिंकला आणि निघाला प्रवासाला