पाटणा Bihar Political Crisis : आज (27 जानेवारी) बिहारमधील सर्व मोठे राजकीय पक्ष आपापल्या आमदारांची बैठक घेणार आहेत. भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 4 वाजता होणार आहे. यापूर्वी दिल्लीतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या सर्व बड्या नेत्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर सुशील मोदींनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री आहेत आणि यापुढंही राहतील, असं स्पष्ट केलं.
अमित शाह यांच्या घरी झाली बैठक : 25 जानेवारीला बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्या एका पोस्टनंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतर बिहार भाजपाच्या सर्व बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं. दिल्लीत बिहार राज्याच्या कोअर कमिटीसोबत केंद्रीय नेतृत्वाची बैठक झाली. यावेळी बिहारचे प्रभारी विनोद तावडे दिल्लीत नसल्यानं त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीला हजेरी लावली. बिहारमध्ये परतलेल्या नेत्यांमध्ये नितीश कुमारसंदर्भात मवाळपणा दिसून आला.
बिहारमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारं वेगानं वाहतंय : कर्पूरी यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी केंद्रातील भाजपा सरकारनं कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करुन नितीश यांना खूश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यामुळं बिहारमध्ये सत्तापरिवर्तनाचे वारे जोरात वाहू लागले.
"राजकारणात कधीही कोणासाठीही दरवाजे पूर्णपणे बंद नसतात. बिहारबाबत केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो राज्यातील नेत्यांना मान्य असेल. मात्र, या क्षणी आम्हाला अजून थोडी वाट पहावी लागेल. आमच्या मते सर्वकाही दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल."- सुशील कुमार मोदी, भाजपा खासदार
काय म्हणाले सुशील मोदी? : दिल्लीत झालेल्या बैठकीतून परतताच भाजपा खासदार सुशील कुमार मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, "नितीशकुमार आजही मुख्यमंत्री आहेत, उद्याही असतील. या विधानानंतर ते बिहारमध्येच राहणार असल्याचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालंय. दुसरीकडं, नितीश कुमार यांनी परिस्थिती स्पष्ट करावी, जेणेकरुन संभ्रम दूर होईल," असं आरजेडी नेत्यांचं स्पष्ट म्हणणं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -