जालना : स्टील कारखान्यात अपघात, कामगाराचा मृत्यू - जालना अपघात बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जालना - औद्योगिक वसाहतीतील राजुरी स्टील नावाने लोखंडी सळ्या बनविणाऱ्या कंपनीत मंगळवार (दि. 15 जून) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अर्जुन मदन (वय 22 वर्षे, रा. केळीगव्हान, ता. बदनापूर) हा कामगार क्रेनजवळ काम करत होता. दरम्यान, पाठीमागून येणार्या एका क्रेनचा धक्का लागल्यामुळे हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही माहिती कळताच केळीगव्हाण गावातील तरुणांनी कंपनीकडे धाव घेतली. कंपनी अर्जुन मदनच्या परिवाराला आर्थिक मदत करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा झाल्यानंतर अर्जुन मदन हा कंपनीमध्ये नव्हे तर कंत्राटदाराच्या हाताखाली काम करत होता. त्यामुळे याची जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे, असे सांगून कंपनीने हा चेंडू कंत्राटदाराकडे सोपविला. त्यानंतर कंत्राटदाराने नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविल्यानंतर चार वाजेच्या सुमारास अर्जुन मदनच्या नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.