कडक निर्बंधांबाबत कोल्हापूर जिल्हा प्रशासन ढिले, 'ईटीव्ही भारत'ची रियालिटी चेक
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कडक निर्बंध असले तरी पहिल्याच दिवशी खासगी वाहतूकदारांनी नियमांना ठेंगा दाखवला आहे. प्रवाशांच्या हातावर कोणत्याच प्रकारचा गृह अलगीकरणाचा शिक्का मारलेला नाही. जवळपास आज जिल्ह्याबाहेरील शेकडो प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले. प्रवासीदेखील या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोना संक्रमनाला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालपासून कडक निर्बंध घोषित केले आहेत. या काळात प्रवासासाठी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची रॅपिड अँटीजन चाचणी आणि त्यांच्या हातावर गृह अलगीरणाचा शिक्का मारणे बंधनकारक केले आहे. गुरुवारी खासगी वाहतूक व जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक झाली. त्यावेळी खासगी वाहतूकदारांनी नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी केले होते. मात्र, या नियमांना खासगी वाहतूकदारांनी ठेंगा दाखवत खुलेआम प्रवासी सोडले आहेत. मुंबई-पुणे-नाशिक या जिल्ह्यातून आज नेहमीप्रमाणे कोल्हापुरात प्रवासी दाखल झाले. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार खासगी वाहतूकदारांनी रॅपिड अँटीजन चाचणी आणि गृह अलगीकरणाचा शिक्का हातावर मारणे आवश्यक होते. मात्र, या नियमाची पायमल्ली केली असल्याचे उघड झाले.