विठ्ठल मंदिरात महाद्वार काल्याने कार्तिकीची सांगता
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - विठ्ठल मंदिरामध्ये गुलाल व बुक्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर कार्तिकी यात्रेची सांगता झाली, असे मानले जाते. चारशे वर्षाहून अधिक वर्षांपासून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. दरम्यान, मागील तीन यात्रेमध्ये मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला पार पडला होता. पण, यंदा वारीचे निर्बंध हटवल्यामुळे हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावली. परंपरेनुसार काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास त्यांच्या मस्तकावर विठ्ठलाच्या पादुका ठेवून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर महाद्वार घाटावरून चंद्रभागा वाळवंट, माहेश्वरी धर्मशाळा, हरिदास वेस या मार्गाने पादुकाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी गुलाल, बुक्का व फुलांची उधळण करीत दर्शन घेतले.