Hopal Guruji Farewell Ceremony: होपळ गुरूजींना निरोप देताना विद्यार्थांना अश्रू अनावर; गावातून काढली गुरुजींची सपत्नीक मिरवणूक
🎬 Watch Now: Feature Video
अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वरुड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वरुड येथे रामदास होपळ गुरूजी यांनी तर विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर ग्रामस्थांच्या मनात घर केले आहे. अवघ्या पाच वर्षांत त्यांनी गावातील शाळेला आदर्श शाळेचा मान देऊन शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रामदास होपळ यांची सपत्नीक गावातून मिरवणूक काढून त्यांना भावनिक निरोप दिला. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. गुरुजी तुम्ही जाऊ नका, असा टाहोच या विद्यार्थ्यांनी यावेळी फोडला होता. आवडत्या मुख्याध्यापकाला निरोप देताना विद्यार्थ्यांनाच नाहीतर ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. अकोट तालुक्यातील वरुड जिल्हा परिषद शाळेमध्ये हे चित्र दिसले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वरुड येथे रामदास होपळ गुरुजी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. 2018 साली होपळ गुरुजी या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. या पाच वर्षांमध्ये त्यांनी व त्यांच्या पत्नी मीनाताई यांनी कृती, कर्तृत्व, प्रेम, जिव्हाळ्याने विद्यार्थ्यांची मनेच नाहीतर अख्ख्या गावकऱ्यांना आपलेसे केले. लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट करीत जिल्ह्यात आदर्श शाळेचा मान मिळवून दिला. अशा या होपळ गुरुजींना निरोप देताना विद्यार्थी व ग्रामस्थांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. मुख्याध्यापक व त्यांच्या पत्नीची गावातून मिरवणूक काढली. रथामधून ही मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गुरुजी व त्यांच्या पत्नीचे परंपरेनुसार औक्षण केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते. गुरुजींना आलिंगन देऊन विद्यार्थी अक्षरशः रडत होते.