Saree Walkathon in London: नऊवारी साडीसह फेटे घालून महाराष्ट्रातील महिलांचा लंडनमध्ये साडी वॉकथॉन, पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : 'नॅशनल हॅण्डलूम डे'निमित्त लंडन येथे साडी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यासह देशातील अनेक महिलांनी सहभाग घेतला. डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वात या साडी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लंडनमध्ये प्रथमच होत असलेल्या या वॉकथॉनमध्ये जवळपास 500 भारतीय महिलांनी सहभाग घेतला होता. विविध राज्यांमधील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लंडन येथील ऐतिहासिक व प्रतिष्ठित ट्रॅफल्गार स्क्वेअर येथे सहभाग घेतला. लंडनमधील स्थानिक वेळेनुसार, रविवारी दुपारी ठीक 1 वाजता या वॉकथॉनचा प्रारंभ झाला होता. पुण्यातील अनुजा हुडके जाधव, सोनिया गोखले व मुंबईतील रमा कर्मोकर, किरण चितळे यांनी या वॉकथॉनमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. 15 वर्षांपासुन इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या अनुजा हुडके जाधव यांनी पुढे माहिती दिली कि, महाराष्ट्रातील जवळपास 50 महिलांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॅण्डलूम्सचे अतिशय दिमाखदार प्रदर्शन केले. पैठणी, दक्षिण महाराष्ट्रातील नारायणपेठ साडी तसेच भंडारा येथील कोसा सिल्क तसेच या महिलांनी पारंपरिक दागिने, नऊवारी साडी आणि भगवा फेटा घालून या वॉकथॉनमध्ये सहभाग घेतला होता. परदेशात असलेल्या लोकांमध्ये भारतीय हातमाग व हस्तनिर्मित दागिन्यांप्रती जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.