Thane RTO Meeting: ठाणे आरटीओने दिला खासगी बस चालकांना दम; बस वेगात रेटाल तर ... - वाढते अपघात
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : महामार्गावरील बसेस, वाढते अपघात आणि खासगी बसचालकांचा सुरू असणारा मनमानी कारभाराच्या विरोधात, आता ठाणे परिवहन विभागाकडून मुसक्या आवळल्या जाणार आहेत. खासगी बस चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता, वेगात बस चालवल्यास बस जप्त केली जाणार आहे. ठाणे परिवहन विभागाकडून आज लुईसवाडी येथील आरटीओच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ठाणे विभागातील खासगी बसेसचे चालक आणि मालकांना आरटीओच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दम दिला आहे. या बैठकीला खासगी बसचे चालक, मालक उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या भीषण अपघातानंतर ठाणे आरटीओने खासगी बस कंपन्यांना वेगवेगळ्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभागाच्या अंतर्गत पाऊले उचलली जात असून, बस चालकांनी नियमाचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रवासी वाहतूक विना अपघात होण्याच्या दृष्टीने बस चालक आणि मालकांसाठी विभागाने नियमावली तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमानुसार वाहतूक नियोजन करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली आहे. या बैठकीला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, विजय शेळके यांनी मार्गदर्शन केले.