Pakistan Zindabad In Chandwad: चांदवड टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा - चांदवडमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
🎬 Watch Now: Feature Video
चांदवड (नाशिक): भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्यावर एका टोल कर्मचाऱ्याने 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. हा प्रकार लक्षात येताच सर्वांनी त्याला हटकले. मात्र, तो घोषणा देत राहिला. यामुळे त्याला कामावरून निलंबित करण्यात आले व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून आता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नाशिकच्या चांदवड येथील मुंबई आग्रा-महामार्गावरील मंगरूळ टोल नाक्यावर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी टोल क्रमांक तीनच्या लेनवर कर्मचारी कार्यरत असताना त्याने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी टोल व्यवस्थापक मनोज पवार यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. यानंतर त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कर्मचाऱ्यास तातडीने निलंबित केले. दरम्यान या प्रकरणी घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जे भारतात राहून भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करत असतील तर अशा गद्दार आणि देशविरोधी घटकांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून पुन्हा कोणीही असे वागणार नाही, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.