Gautami Patil program: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; मद्यपी तरुणांकडून माध्यम प्रतिनिधींना मारहाण - गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना मारहाण झाली. तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी कार्यक्रम दिसत नाही, म्हणून माध्यम प्रतिनिधींना खुर्च्या फेकत मारहाण केली. यात माध्यम प्रतिनिधी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या ठक्कर डोम येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी पत्रकारांना मारहाणही केली आहे. गौतमी पाटीलचा डान्स दिसत नसल्यामुळे तरुणांनी पत्रकारांना खुर्च्यांनी मारहाण केली. यामध्ये एका वृत्तपत्राचे फोटोग्राफर आणि एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन जखमी झाला आहे. यामध्ये मीडियाच्या अनेक कॅमेऱ्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र नाशिक पोलीस गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यात दंग असल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली. यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.