Ajit Pawar : पुणे जिल्ह्यावर कुणाचे वर्चस्व?, मवाळ विरुद्ध जहाल दादांची चर्चा - चंद्रकांत पाटील मवाळ नेते
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राष्ट्रवादीच्या बंडखोरीनंतर पुणे जिल्ह्यावर कुणाचे वर्चस्व? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्यात कोण नेतृत्व करणार असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. एकेकाळी एकामेकांवर टीका करणारे आज मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यामुळे आपले प्रश्न कसे सुटणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रकांत पाटील हे मवाळ नेते आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अधिकाऱ्यांसोबतच काम करताना चंद्रकांत पाटील मवाळ भूमिकेने काम करतात. तर अजित पवार हे दबंग नेते आहेत. ते अधिकाऱ्यांवर दादागिरी करतात, असेही बोलले जाते. त्यामुळे अजित पवारांची काम करण्याची पद्धत पाहता ते पुण्याचे पालकमंत्री होतील अशी, प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर बिजले यांनी दिली आहे. अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादीत बंडखोरीनंतर पवार विरुद्ध पवार असे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत गोंधळाचे वातावरण पहायला मिळत आहे. काही कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात तर, काहींचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा आहे.