VIDEO : पाचोऱ्यात हिवरा नदीच्या पुरात तरूण गेला वाहून; जळगावात SDRFची टीम दाखल - जळगावात मुसळधार
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा शहरातील एक तरुण हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. आज (मंगळवार) दुपारी ही घटना घडली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. पाचोरा येथील हिवरा नदीला देखील मोठा पूर आला असून, नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज दुपारी कृष्णापुरी भागातील रहिवासी असलेला साहेबराव उत्तम पांचाळ हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्याला पोहता येत होते. मात्र, पुराचा जोर अधिक असल्याने तो वाहून गेला. काही वेळाने १० किलोमीटर अंतरावर पुढे परधाडे पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. जिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहेत. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) 35 जणांची एक टीम जळगावमध्ये दाखल झाली आहे. त्यापैकी 10 जणांचे पथक बोटीसह इतर साहित्य घेऊन पाचोऱ्याकडे रवाना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांनी दिली आहेत.