Covid Vaccination : लहान मुलांना लस व ज्येष्ठांना बूस्टर डोससाठी केंद्राकडे मागणी - राजेश टोपे - immunization of children
🎬 Watch Now: Feature Video
जालना : लहान मुलांच्या लसीकरणासह(Covid Vaccination) ज्येष्ठांना बूस्टर डोस(Booster Dose) देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी सोमवारी जालन्यात बोलताना दिली. शाळा सुरू झाल्याने 11 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने या वयोगटातील कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. या मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचंही मत आहे असे टोपे म्हणाले. मुलांना लसीकरण आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग भरवण्याची मागणी पालकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे 5 वी पासून पुढील वर्ग आधीच उघडले असून 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं असून याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही टोपे म्हणाले. राज्यात चिकनगुनियाचं प्रमाण वाढलं असून या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाला देखील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याच टार्गेट ठेवण्यात आलं असून जास्तीत जास्त 15 डिसेंबरपर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.